बुलढाण्यात भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी निघालेल्या रॅलीदरम्यान आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर ठेका धरला. विशेष म्हणजे, याचवेळी त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवत नेमकं कुणाला खुणावलं? याची चर्चा आता बुलढाणा शहरात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यात राजकीय कुरघोडी सुरू असल्याचं चित्र आहे. त्यातच आता रॅलीतील या कृतीमुळे बुलढाण्यात महायुतीत ‘ऑल इज वेल’ आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये भाजप आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या हरियाणवी गाण्यावर ठेका धरला. या डान्स दरम्यान श्वेता महाले यांनी हाताने ‘धनुष्यबाण’ (शिवसेनेचे चिन्ह) ताणून दाखवले. भाजपच्या रॅलीत शिवसेनेचे चिन्ह दाखवून त्यांनी स्थानिक पातळीवर राजकीय इशारा दिल्याचा अंदाज वर्तवला गेला, ज्यामुळे वाद पेटला आहे.













