पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं दरवर्षीप्रमाणं यंदा देखील ऋषीपंचमीनिमित्तानं अथर्वशीर्ष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. “ओम नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नमः:… मोरया, मोरया”, जयघोष करत तब्बल 35 हजार महिलांनी एकत्र येत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या समोर अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन केलं. एकाचवेळी 35 हजार भाविकांचे पठण होत असल्यानं अत्यंत भक्तीमय आणि प्रसन्न वातावरणाचा प्रत्येकानं अनुभव घेतला. यावेळी या कार्यक्रमाला हजारो महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली. या अथर्वशीर्ष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे महापौर मंजुषा नागपूरे, विभागीय आयुक्त शीतल तेली -उगले उपस्थित होत्या.
मंडळाच्या वतीनं गेल्या 40 वर्षापासून ऋषीपंचमीनिमित्तानं अथर्वशीर्ष सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे यंदा 41 वे वर्ष असून अनेक विक्रम या कार्यक्रमाचे झाले आहेत. यावेळी पारंपरिक पोषाखात मध्यरात्री 1 वाजल्यापासून महिलांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर अथर्वशीर्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन करण्यात आलं. यावेळी उपस्थित महिलांकडून हात उंचावून टाळ्यांचा गजर करत तसेच टॉर्चलाईट लावूनदेखील गणरायाला वंदन केलं. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली होती. पुण्यासह विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला होता.












