दरवर्षीप्रमाणे यंदाही अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या घरी गणरायाचं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं आहे. मात्र, यंदाचा गणेशोत्सव सोनाली कुलकर्णी यांच्यासाठी काहीसा खास आणि वेगळा आहे. कारण यावर्षी त्यांनी आपला गणेशोत्सव थेट अन्नदात्या बळीराजाला समर्पित केला आहे. शेती, शेतकरी आणि बळीराजाच्या कष्टांना सलाम करणारी अनोखी संकल्पना सोनाली यांच्या घरच्या गणेशोत्सवात पाहायला मिळत आहे.
यंदा सोनाली कुलकर्णी यांच्या घरी पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती विराजमान झाली आहे. विशेष म्हणजे या मूर्तीला पारंपरिक बैलगाडीत स्थान देण्यात आलं आहे. बैलगाडी म्हटलं की ग्रामीण महाराष्ट्र, शेती आणि शेतकऱ्याचं जीवन डोळ्यांसमोर उभं राहतं. त्यामुळं बैलगाडीत विराजमान झालेला गणराय हा केवळ सजावटीचा भाग नसून, त्यामागे बळीराजाच्या कष्टांना मानाचा मुजरा करण्याची भावना आहे.
यंदाच्या गणेशोत्सवाची आणखी एक खास बाब म्हणजे गणेशमूर्ती सोनाली कुलकर्णी यांच्या कुटुंबातील सदस्यांनी स्वतः तयार केली आहे. त्यांचे भाऊ आणि भावजय यांनी ही सुंदर गणेशमूर्ती स्वतःच्या हातानं साकारली आहे. त्यामुळं या मूर्तीला कलात्मकतेसोबतच कुटुंबीयांच्या मेहनतीची आणि भावनेचीही जोड मिळाली आहे. आपल्या घरच्या गणरायासाठी स्वतः मूर्ती तयार करण्याची ही कल्पना आणि त्याला बळीराजाच्या संकल्पनेची जोड देणं, हे यंदाच्या उत्सवाचं वेगळेपण ठरलं आहे.








