देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही सुरू झाली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला. ‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळा आणि लडाखच्या स्वायत्ततेसाठी आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज (18 जुलै) केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
यावेळी त्यांच्याकडून 12 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध असलेला ‘शक्तीपीठ महामार्ग’ तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी विठ्ठलानं द्यावी, असं साकडं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी घालण्यात येणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं.
माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आणि आमदार सतीश पाटील यांच्यासह पंढरपूरला रवाना होण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचे कारण देत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असलं, तरी ही कारवाई आंदोलन दडपण्यासाठी केंद्र सरकारनं रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. ते म्हणाले, “20 जुलै रोजी जंतर-मंतर येथे होणाऱ्या मोठ्या आंदोलनापूर्वीच सरकारनं न्यायालयाचा आदेश मिळवून ही कारवाई केली. आरोग्याचं कारण पुढे करून आंदोलनाचा मूळ मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
‘नीट’ परीक्षेतील कथित घोटाळ्याचा उल्लेख करत सतेज पाटील म्हणाले, “राहुल गांधी गेल्या तीन-चार महिन्यांपासून हा मुद्दा सातत्यानं मांडत आहेत. 23 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारला ‘नीट’ परीक्षा सुरळीत घेता येत नसेल, तर ते देश कसा चालवणार?” यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. “सरकारने चूक मान्य केली असताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली. सतेज पाटील यांनी राज्य सरकारवरही टीका करत शिक्षण विभागातील मान्यता आणि बदल्यांसाठी कथितपणे ‘दरपत्रक’ तयार असल्याचा गंभीर आरोप केला.
भाजपाच्या अंतर्गत स्थितीवर भाष्य करताना सतेज पाटलांनी पक्षातील मूळ कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “भाजपाचा मूळ कार्यकर्ता आजही सतरंज्या उचलण्याचं काम करत आहे, तर बाहेरून आलेले लोक सत्तेचा उपभोग घेत आहेत.”
श्रीराम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत त्यांनी, “प्रभू रामाच्या नावानं मतं मागितली जातात. मात्र कृती रावणासारखी केली जात आहे,” अशी टीका केली. यावेळी सध्या सुरू असलेल्या जात पडताळणीच्या कारवाईवरही त्यांनी भाष्य केले. जात पडताळणीसाठीची प्रक्रिया आणि खिडकी कायमस्वरूपी सुरू ठेवावी, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवरील राजकीय दबाव कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी सतेज पाटलांनी केली.












