साताऱ्यातील जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील फुलोत्सव आजपासून सुरू झाला आहे. कास पठारावर नव्यानं उभारण्यात आलेल्या सोवेनियर शॉप, पर्यटक निवारा शेड तसंच विविध विकासकामांचं लोकार्पण खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झालं. कास पठार वेगवेगळ्या प्रजातींच्या फुलांनी बहरून गेलं आहे. प्रति दिन केवळ तीन हजार पर्यटकांना तर शनिवार, रविवार आणि शासकीय सुटीच्या दिवशी केवळ ऑनलाइन बुकिंग असलेल्या पर्यटकांनाच पठारावर प्रवेश मिळणार आहे.
पर्यटकांनी पठारावर स्वयंशिस्त पाळून फुलोत्सवाचा आनंद लुटावा, असं आवाहन उदयनराजेंनी केलं. दरम्यान, पर्यटनाचा विस्तार पठारापुरता मर्यादित न ठेवता परिसरातील नैसर्गिक स्थळांचा देखील विकास करण्यात येत आहे.
निसर्गसौंदर्य तसंच जैवविविधतेनं नटलेलं ‘मंडपघळ’ हे ठिकाण पर्यटकांसाठी यंदा मुख्य आकर्षण ठरणार आहे. पर्यटकांनी फुलांमध्ये पाय देऊ नये, कचरा करू नये, असं आवाहन सातारा वन विभाग आणि कास पठार संवर्धन समितीनं केलं आहे.
यावेळी कास पठार वन विभाग कार्यालयाचं उद्घाटन झालं. कास पठारावर यंदा प्रथमच ‘हिरकणी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यावेळी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौन्धळ, दिगंबर जाधव, जयश्री जाधव, साताऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, संतोष पाटील, पठार वन समितीचे सदस्य उपस्थित होते.

कास पठारावर आता चवर, तेरडा, सीतेची आसवे, गेंद, नभाळी, आभाळी कंदील पुष्प आणि कुमुदिनी फुलांना बहर येऊ लागल्यामुळे जगभरातील पर्यटकांना यंदाच्या फुलोत्सवाचे वेध लागलेत. पर्यटकांसाठी कास वन समिती सज्ज झाली आहे. पर्यटकांसाठी यंदापासून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, निसर्गसंपदेला धोका पोहोचू नये, या दृष्टीकोनातून दिवसाला केवळ तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय. तसंच शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी थेट येणाऱ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाने ऑनलाईन बुकींगची सुविधा उपलब्ध केली आहे. http://www.kas.ind.in या अधिकृत संकेतस्थळावरून पर्यटकांना बुकिंग करता येईल. 12 वर्षांवरील पर्यटकांना 200 रुपये प्रवेशशुल्क आकारण्यात येईल. त्यात पार्किंग ते पठारापर्यंत बससेवा समाविष्ट आहे. शालेय सहलीसाठी प्रति विद्यार्थी 40 रुपये शुल्क भरावे लागेल. इलेक्ट्रिक वाहनासाठी 100 रुपये, गाइड शुल्क 200 रुपये प्रति तास (1 व्यक्ती ते 10 जणांचा ग्रुप) आकारले जाणार आहे. यंदा पर्यटकांना एकीव व कुमुदिनी टेहळणी मनोऱ्यावरून पुष्प पठाराचा नजारा डोळ्यात साठवता येणार आहे.













