मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये भाजप आमदार श्वेता महाले यांनी ‘बाप तो बाप रहेगा’ या हरियाणवी गाण्यावर ठेका धरला. या डान्स दरम्यान श्वेता महाले यांनी हाताने ‘धनुष्यबाण’ (शिवसेनेचे चिन्ह) ताणून दाखवले. भाजपच्या रॅलीत शिवसेनेचे चिन्ह दाखवून त्यांनी स्थानिक पातळीवर राजकीय इशारा दिल्याचा अंदाज वर्तवला गेला, ज्यामुळे वाद पेटला आहे.
मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव आणि भाजप आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर श्वेता महाले यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. तर वीजपुरवठा खंडित करण्यामागे आमदार संजय गायकवाड असल्याचा संशयही त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त करत हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढा, असं म्हणत आमदार गायकवाडांना ओपन चॅलेंज दिलंय. दरम्यान, आमदार श्वेता महालेंनी दिलेल्या या थेट आव्हानाला आता संजय गायकवाड यांनीही प्रत्युत्तर देत प्रतिहल्ला केला आहे. ‘राजकारणातला बाप कोण आहे हे योग्यवेळी दाखवून देऊ’ असं त्यांनी म्हटलंय. तर जनतेने संजय गायकवाडच्या रॅली पाहिलेल्या आहेत, मी कशाला कुणाला घाबरू, असेही आमदार संजय गायकवाड म्हणाले आहे.
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवाने रॅली काढून वाढदिवस साजरा केला, याचं मला फार वाईट वाटलं. मला फाईट करता, तर तुम्ही माझ्याशी विकासाची फाईट करा. मी जर एखाद्या शेतकऱ्याला मदत केली तर तुम्हीही मदत द्या. वाढदिवसाला खर्च केल्यापेक्षा एखादे गरीबाला मदत करा. आम्ही अशी उधळपट्टी कधी करत नाही. आमचेही वाढदिवस होतात, पण आम्ही एव्हढे कधी खर्च करत नाही. बाप तो बाप रहेगा, हे माणसाने बोललं तर बरं आहे. एखाद्या बाईने म्हटले की मी बाप आहे तर बापासारखे शरीर कुठून आणणार आहे. हे शोभते का बोलायला. मग राजकारणातला बाप कोण आहे हे योग्यवेळी आम्ही दाखवून देऊ, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांना दिला आहे.
आमदार श्वेता महाले एक महिला आमदार आहे. माझी बहीण आहे, ताई आहे. मला समोर येऊन बोला म्हटल्या, बँक निवडणुकीत आमही सोबत होतो. एका ताटात आम्ही एका चमचाने जेवण केले, त्यामुळे समोर येण्याचा काही प्रश्न नाही. वाढदिवसाला स्पर्धा करणे हा काही विषय नव्हता. त्यांनी बुलढाणामध्ये भाजप वाढवावी आम्ही, चिखलीत शिवसेना वाढवू, कशाला विरोध करता. फक्त इकडची भाजपा काँग्रेसच्या दावणीला बांधल्या जाणार नाही, याची काळजी घ्या असा सल्लाही आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांना दिला आहे.
रॅली पाहून घाबरले आणि लाईट बंद केली म्हणता तर संजय गायकवाडच्या रॅली लोकांनी पाहिलेल्या आहेत, त्यामुळे मी कशाला घाबरू . आमच्याही कार्यक्रमाता लाईट जाते. मी कर्नाटकला होतो, माझा काही संबंध नाही. मी वाढदिवसाच्या रॅलीला प्रतिउत्तर देत नाही. माझ्याकडे हरामाचा पैसे नाही. मी अशी पैशाची उधळपट्टी करणार नाही. वाढदिवस साजरा करताना आम्हाला माणसे काही भाड्याने आणावे लागत नाही. या या माझा वाढदिवस आहे मला शुभेचा द्या! असं म्हणावं लागत नाही. अधिकाऱ्यांना, पोलिसांना कामाला लावा, असा कुठे वाढदिवस असतो का? यारे या आम्हाला शुभेचा द्या, असं कुठे असते का? शुभेच्छा मनातून देत असतात. असे म्हणत संजय गायकवाड यांनी श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त निघालेल्या रॅलीवरूनही डिवचलं आहे.













