गेल्या 21 दिवसांपासून आमरण उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज शनिवारी (18 जुलै) सकाळी पोलिसांनी उपोषणस्थळावरून हटवून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या घटनेनंतर दिल्लीत तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या निर्दयी आणि क्रूर पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळलं जात आहे, ते अत्यंत लज्जास्पद आहे. सरकारला जर सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची इतकीच काळजी होती, तर त्यांच्याशी आधीच चर्चा करून तोडगा काढायला हवा होता.”
“हे सरकार ‘नीट’ परीक्षा नीट घेऊ शकत नाही, आंदोलनही नीट हाताळू शकत नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्यात असं काय आहे? की त्यांच्या चुका असूनही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, किती बळी गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जाणार, हे केंद्र सरकारनं जाहीर करावं,”
“सोनम वांगचुक स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आंदोलन करत आहेत. सरकारनं त्यांचे आंदोलन दडपल्यानंतर आता विद्यार्थीही उपोषणाला बसले आहेत. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. देशाची युवा शक्ती अशा प्रकारे वाया जात असताना सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्या चुकांवर पांघरूण घालत आहे,”
“दिल्ली पोलिसांनी सर्वप्रथम तो न्यायालयीन आदेश सार्वजनिक करावा, ज्याच्या आधारे सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं”.
“न्यायालयानं त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र, यापूर्वीही देशात अनेक आंदोलनं झाली आहेत. आंदोलकांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्यास भाग पाडण्यात आलं आहे. अशा प्रकारे अनेक प्रश्न संवादातून सोडवले गेले आहेत. अद्यापही वेळ गेलेली नाही. सरकारने चर्चा करून मार्ग काढावा.” उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “सरकारनं आपलंच म्हणणं रेटून लादणं म्हणजे लोकशाही नव्हे. अशा पद्धतीला हुकूमशाही म्हणतात.”












