“संगीतकला ही गुरुजनांच्या सहवासातच खऱ्या अर्थाने बहरते. विद्यार्थ्यांनी गुरुजनांकडून प्राप्त झालेली विद्या, मेहनत, अभ्यास आणि इच्छेच्या बळावर जोपासली पाहिजे, तरच संगीत क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवता येईल,” असे प्रतिपादन प्रसिद्ध तबलापटू सलील जोशी यांनी केले.
फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये नुकताच एका विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रणाम फाऊंडेशनच्या सहकार्याने, गुरुवर्य विशाल मडकईकर आणि त्यांच्या शिष्यपरिवाराने गुरुवर्य कै. पं. अशोक गोडबोले यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सलील जोशी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रणाम संस्थेच्या अध्यक्ष चैताली नाईक आणि विशाल मडकईकर उपस्थित होते. सलील जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तबला वादनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमात विशाल मडकईकर यांच्या शिष्य परिवाराने सोळा मात्रांचा त्रिताल, दहा मात्रांचा झपताल आणि पंधरा मात्रांचा सवारी ताल सादर केला. त्यांना नगमासाथ आकाश जल्मी यांनी केली. तसेच, विशाल मडकईकर यांनी पंजाब घराण्याच्या काही खास बंदिशी सादर केल्या, तर त्यांचे शिष्य मंत्राक्ष यांनी या बंदिशी गुरुंसोबत तबल्यावर वाजवून दाखवल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा तिळवे यांनी केले.












