“राज्य सरकारनं जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल,” अशी घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी पोहोचत नाही, तोपर्यंत हे काम चालणार आहे.”
यावेळी बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, “17 लाख शेतकऱ्यांची यादी सरकारनं दिलीय. यातील 12 लाख 80 हजार शेतकऱ्यांची ई केवायसी झाली. 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत मदत देण्यात आलीय. उर्वरित 6 लाख 50 हजार शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यात मदत मिळणार आहे.”
पुढे बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, “आमच्यातर्फे वेळेची कोणतेही अट ठेवण्यात आलेली नाही. ज्या कोणत्या त्रुटी शिल्लक असतील, त्या त्रुटी पूर्ण करून शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ घ्यावा. दोन महिन्याची अट, एक महिन्याची अट अशा प्रकारच्या बातम्या ज्या येत आहेत, त्या खोट्या असून अशी कोणतीही अट सरकारतर्फे ठेवण्यात आलेली नाही. मात्र शेतकऱ्यांनी स्वतः त्या त्रुटी सुधारायला हव्यात.”
यावेळी बोलताना मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, “मृत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीची रक्कम मिळणार आहे. मृत शेतकऱ्यांचे आपण वारस आहोत, हे सिद्ध झाल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीची मदत मिळणार आहे. 50 हजार मृत शेतकऱ्यांच्या वारसांना ही कर्जमाफी देण्यात आली आहे.”
“शेतकऱ्यांना सरकारतर्फे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल,” असंही यावेळी सांगण्यात आलं. आधी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि त्यानंतरच प्रोत्साहन अनुदानाची प्रक्रिया केली जाईल, असंही ते म्हणाले.
”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आमची वाटचाल सुरू आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. पक्षात सर्व व्यवस्थित सुरू आहे”, असंही यावेळी बाबासाहेब पाटील म्हणाले.











