“उमेदवारांना त्यांच्या मागण्या मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे; तथापि, धमकी, दबाव अथवा गैरवर्तन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. सदर घटना अत्यंत गंभीर व दुर्दैवी असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे,” अशी अत्यंत कडक व रोखठोक प्रतिक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी दिली आहे.
शुक्रवारी (११ सप्टेंबर) एमपीएससीच्या मुंबई येथील कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी अचानक शिरून सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या अंगावर शाई फेकून त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. या खळबळजनक घटनेनंतर प्रशासकीय वर्तुळात तीव्र असंतोष पसरला असून, खुद्द सचिवांनीच या प्रकारावर थेट भाष्य करत बेकायदेशीर वर्तन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, आयोगाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे, ज्यामुळे परीक्षा नियोजनावर गंभीर सावट निर्माण झाले आहे.
एमपीएससीचे प्रशासकीय प्रमुख म्हणून सचिव महेंद्र हरपाळकर यांनी या संपूर्ण प्रकारावर तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “सदर घटना अत्यंत गंभीर व दुर्दैवी असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध पोलिसांकडून FIR दाखल करण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या घटना आयोगाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम करणाऱ्या असून, निर्भय व सुरक्षित वातावरणात काम करण्याच्या त्यांच्या अधिकारावरही परिणाम करतात. उमेदवारांना त्यांच्या मागण्या मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे; तथापि, धमकी, दबाव अथवा गैरवर्तन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.”
नेमकी घटना काय होती?
अलीकडच्या काळातील एका परीक्षेत झालेल्या कथित पेपरफुटी व गैरप्रकाराबाबत उमेदवारांमध्ये अस्वस्थता व संताप होता. याच मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी एमपीएससी कार्यालयात घुसून सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या अंगावर शाई फेकली आणि कर्मचाऱ्यांना धमकावले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आरोपींवर एफआयआर दाखल केला आहे.












