मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्यात आले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याच्या प्रकरणानंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाली असून, मुंबई महापालिका सभागृहात महापौर रितू तावडे यांनीही याबाबत अधिकृत घोषणा केली.
विशाखा राऊत या वॉर्ड क्रमांक 191 मधून निवडून आल्या होत्या. हा प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होता. निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवार प्रिया सरवणकर-गुरव यांचा पराभव केला होता. मात्र, विशाखा राऊत यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला आणि जात पडताळणी समितीने ते अवैध ठरवले. त्यानंतर उच्च न्यायालयातही राऊत यांना दिलासा मिळाला नाही.
वॉर्ड क्रमांक 191 मध्ये निकाल काय लागलेला?
दादर परिसरात येणाऱ्या वॉर्ड क्रमांक 191 मधून विशाखा राऊत यांनी 197 मतांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदेंच्या प्रिया सरवणकर-गुरव होत्या. प्रिया सरवणकर-गुरव यांना एकूण 13039 मतं मिळाली होती.













