भारतीय सशस्त्र दलांनी या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले. दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलांचे हे प्रतीक आहे. त्‍यामुळे पाकिस्‍तानमधील दहशतवाद्‍यांना नेस्‍तनाबूत करण्‍यासाठी राबवलेल्‍या मोहिमेला भारतीय सैन्‍यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्‍यात आले.

२२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून पर्यटकांची हत्या केली होती. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्‍यू झाला होता. दहशतवाद्यांनी फक्त पुरूषांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्‍या. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, भारताने सिंधू पाणी करार निलंबित करण्यापासून ते पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यापर्यंत अनेक निर्बंध लादले. या हल्ल्याचा जागतिक पातळीवरही निषेध करण्यात आला.

पहलगाममधील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी भारतीय हवाई दल आज पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात युद्ध सराव करणार असताना भारताने ही कारवाई केली आहे. यामध्ये राफेल, मिराज-२०००, तेजस आणि सुखोई-३० सारख्या सर्व आघाडीच्या लढाऊ विमानांचा समावेश असेल. त्याच वेळी, देशातील २५९ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये नागरी सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित केली जाणार आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्‍यमुखी पडलेल्‍या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी म्हणाल्या, “माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छिते. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर दिले, त्यामुळे त्यांनी आमचा विश्वास जिवंत ठेवला आहे. हीच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे. माझे पती कुठेही असले तरी आज त्‍यांना शांतता लाभली असेल. आज ते शांततेत असतील.”

भारताच्या लष्करी कारवाईनंतर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या कौस्तुभ गणबोटे यांच्या मुलाने प्रतिक्रिया देत, या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कौस्तुभ गणबोटे यांचा मुलगा कुणाल गणबोटे म्हणाले की, “आम्ही सर्वजण अशा कारवाईची वाट पाहत होतो आणि आम्हाला केंद्र सरकारकडून ही आशा होती. या कारवाईचे नाव “सिंदूर” आहे आणि मला वाटते की माझ्या आईसारख्या महिलांचा आदर करण्यासाठी हे नाव देण्यात आले आहे…”

ऑपरेशन सिंदूरवर कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, “सैन्यदलाने केलेली कारवाई योग्य आहे आणि त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देऊन त्यांनी महिलांचा आदर केला आहे. आम्ही पंतप्रधान मोदी अशी कारवाई कधी करतील याची वाट पाहत होतो आणि त्यांनी त्यांना योग्य उत्तर दिले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा केला पाहिजे.”

भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. हे हवाई हल्ले २०१९ मध्ये बालाकोटमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर आणि २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारताने केलेला सर्वात मोठा हवाई हल्ला होता.