kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

गरीब महिलांना वर्षाला १ लाख, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार: राहुल गांधी

काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहिरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एमएसपीचा कायदा, ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणे, अग्निवीर योजना बंद करणार तसेच भारतातील गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.

भंडारा जिल्ह्यातील साकोलीत राहुल गांधी यांची विदर्भातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार चंद्रकांत हंडारे, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे गडचिरोली चिमूरचे काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव किरसन, नागपूरचे उमेदवार आ. विकास ठाकरे, चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोकर यांच्यासह विदर्भातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, एससी एसटी, आदिवासी, ओबीसी समाजाची सरकारमध्ये भागिदारी अत्यल्प आहे. जेवढी लोकसंख्या तेवढाच अधिकार त्या समाजाला मिळाला पाहिजे यासाठी काँग्रेस सरकार सत्तेत येताच जातनिहाय जनगणना व आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करण्याचे क्रांतीकारी काम करणार आहे. मोदी सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी म्हणाले की, सरकार मोदींचे नाही तर अदानीचे आहे, एका अरबतीचे सरकार आहे व नरेंद्र मोदींनी १० वर्षात त्यांच्यासाठीच काम केले. आज देशातील विमानतळे, बंदरे, रस्ते, खाण, कोळसा, सौरऊर्जा सर्वकाही अदानी यांचेच झाले आहे.