लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज लोकसभेत ‘फायर’ मूडमध्ये दिसले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर संसदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत गंभीर आरोप केले. राहुल म्हणाले की, लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमधील काही महिन्यांतच राज्यातील मतदारांची संख्या हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतकी वाढली आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने राज्यातील विरोधी पक्षांना मतदार यादीशी संबंधित डेटा पुरवावा. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेत भाग घेताना त्यांनी असेही म्हटले की, ते कोणतेही आरोप करत नाहीत परंतु आयोगाने त्याचे उत्तर द्यावे.
राहुल गांधी म्हणाले, ‘महाराष्ट्र निवडणुकीशी संबंधित काही आकडेवारीकडे मी या सभागृहाचे लक्ष वेधू इच्छितो. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके लोक महाराष्ट्राच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. अचानक 70 लाख नवीन मतदार आले.
ते म्हणाले की, महाराष्ट्रात पाच वर्षांत जितके मतदार वाढले आहेत त्यापेक्षा पाच महिन्यांत जास्त मतदार वाढले आहेत. राहुल गांधींनी दावा केला की, ‘शिर्डीतील एका इमारतीत 7 हजार मतदारांची नोंदणी झाली. मनोरंजक म्हणजे, नवीन मतदार बहुतेक अशा मतदारसंघांमध्ये जोडले गेले जिथे भाजपला आघाडी मिळाली.’
ते पुढे म्हणाले की, ‘मी कोणतेही आरोप करत नाहीये, मी फक्त एवढेच म्हणत आहे की निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणुकीचा डेटा काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (सपा) यांना उपलब्ध करून द्यावा.’
यापूर्वी, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी ‘मतदारांच्या संख्येत’ वाढ झाल्याबद्दल निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले होते. काँग्रेसने यापूर्वीही दावा केला होता की, महाराष्ट्रात पाच महिन्यांच्या कालावधीत 50 लाखांहून अधिक मतदारांची आश्चर्यकारक वाढ झाली आहे. निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये म्हटले होते की, राज्यातील मतदारांची नावे मनमानी पद्धतीने जोडली किंवा वगळली गेली नाहीत.
राहुल गांधी नेमकं काय-काय म्हणाले
‘शिर्डीत एका इमारतीत 7 हजार नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे. एका बिल्डिंगमध्ये 7 हजार नवे मतदार.. मी कोणताही आरोप लावत नाहीए. मी फक्त म्हणतोय की, यामध्ये काही ना काही अडचण आहेत. हिमाचल प्रदेशाएवढे मतदार लोकसभेनंतर जादूने येतात.’
‘आम्ही निवडणूक आयोगाला सातत्याने सांगितलं आहे की, आम्ही आरोप लावत नाहीए. पण तुम्ही एक काम करा.. आम्हाला लोकसभेची मतदार यादी द्या आणि विधानसभेची यादी द्या.’
‘मी अद्यापही कोणताच आरोप लावत नाही. पण निवडणूक आयोगाने आम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतदार यादी द्यावी. ज्यामध्ये मतदारांची नावं आणि पत्ता असेल.’
‘माझी ही कोणतीही बेजबाबदार विनंती नाही. ही अगदी सोप्पी मागणी आहे जे ती पूर्ण करू शकतात.’
‘निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही पंतप्रधान, विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश यांच्या कमिटीकडून झाली पाहिजे होती. पण या निवड समितीतून सरन्यायाधीशां काढून टाकण्यात आलं. का असं केलं? हा आमचा सवाल आहे.’
‘मी जी मतदार यादी मागत आहे. त्याबाबत मला पूर्णपणे खात्री आहे की, निवडणूक आयोग आम्हाला देणार नाही.’ असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.