kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा बनावट व्हिडीओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी मुंबई पोलिसामध्ये तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या सोशल मीडियावरील अकाउंट्सवरून अमित शाह यांच्याशी संबंधित बनावट व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याची तपशीलवार माहितीही पोलिसांना देण्यात आली. यामध्ये महाविकास आघाडीशी संबंधित महाराष्ट्र काँग्रेसच्या युथ एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम अकाऊंटचा समावेश आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी एससी, एसटी किंवा ओबीसी आरक्षण संपवण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही, हा व्हिडीओ खोटा आहे. यापूर्वीच्या भाषणांदरम्यान शाह म्हणाले होते की, सरकार स्थापन होताच मुस्लिम समाजाला दिलेले असंवैधानिक आरक्षण काढून टाकण्यात येईल. हा फेक व्हिडीओ महाविकास आघाडीतील युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षांच्या विविध जिल्ह्यांचे एक्स, इंस्टाग्राम, फेसबुक पेज तसेच विविध पक्ष, सेल आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या एक्स अकाउंटवरून प्रसारित करण्यात आला आहे.

असा बनावट व्हिडीओ बनवून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भारतीय जनता पार्टीची बदनामी करून समाजातील विविध गटांमध्ये तेढ निर्माण होईल असं वातावरण निर्माण करण्यात आलाची तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे असे कृत्य करत जनमानसातील एकोपा आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचा समाजकंटकांचा प्रयत्न असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी असेही मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी म्हटले आहे.