kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुन्हा चलो दिल्लीचा नारा, शेतकरी शंभू सीमेवरून पुन्हा दिल्लीकडे कूच करणार; पंजाब- हरियाणा मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली!

हमीभावासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांचा मोर्चा शंभू सीमेवर अडवून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला होता. यामध्ये आठ शेतकरी जखमी झाले असून शेतकऱ्यांनी हा मोर्चा दिवसभरासाठी स्थगित केला होता. आता हा मोर्चा पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे. किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएम गटातील १०१ शेतकरी दुपारी दिल्लीकडे कूच करणार आहेत. यामुळे पंजाब-हरियाणा सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांना रोखण्याकरता बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी सांगितलं की, किमान आधारभूत किंमतीसाठी कायदेशीर हमीसह त्यांच्या चिंता आणि मागण्यांबाबत केंद्राकडून चर्चेसाठी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ८ डिसेंबर रोजी १०१ शेतकऱ्यांचा गट दिल्लीकडे पुन्हा मोर्चा काढणार आहे.

“केंद्राने शेतकरी आणि मजुरांशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आम्हाला रोखण्यासाठी बळाचा वापर करत आहेत. कालच्याप्रमाणे आम्ही शांततेने आणि शिस्तीने दिल्लीत जाऊ. आम्ही १०१ शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दुपारी १२ च्या सुमारास दिल्लीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही पंढेर म्हणाले.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी संसदेची दिशाभूल केल्याचाही आरोप पंढेर यांनी केला आहे. “कृषीमंत्री संसदेची दिशाभूल करत आहेत. आम्ही एमएसपीवर कायदेशीर हमीची मागणी करत आहोत. पण मंत्री गप्प आहेत”, असं पंढेर म्हणाले.

किसान मजदूर मोर्चा आणि SKM गटातील १०१ शेतकरी दुपारी दिल्लीकडे कूच करणार आहेत. १०१ पैकी ८५ बीकेयू क्रांतीकारी युनिटमधील आहेत तर उर्वरित किसान मजदूर मोर्चा, बीकेयू बेहरामके, बीकेयू आझाद, किसान संघटना, राजस्थान युनिटमधील आहेत. तर, आंदोलकांमधील ज्येष्ठ नागरिक मोर्चाचे नेतृत्व करतील, असे शेतकरी नेते रणजितसिंग राजू यांनी सांगितले.

शुक्रवारी काय घडलं?

पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभूपासून दिल्लीकडे मोर्चा नेण्यासाठी १०१ शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी तयारी केली. मात्र काही मीटर अंतरावरच त्यांना हरियाणा सुरक्षा दलांनी टाकलेल्या बॅरिकेडमुळे थांबावे लागले. बॅरिकेडपर्यंत आंदोलक पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला आणि आंदोलकांना मागे जाण्यास भाग पाडले.

आंदोलक ‘सत्नम वाहेगुरू’च्या घोषणा देत होते. अनेक शेतकऱ्यांनी बॅरिकेडचा पहिला अडथळा सहज दूर केला. पण त्यानंतरचे अडथळे त्यांना दूर करता आले नाहीत. काही आंदोलक लोखंडी जाळ्या घग्गर नदीवर बांधलेल्या पुलाखाली ढकलताना दिसले. एक आंदोलक सुरक्षारक्षक थांबतात त्या ठिकाणी एका शेडवर चढला. त्याला जबरदस्तीने खाली उतरवण्यात आले. शंभू सीमेवर पाण्याचा मारा करणारी वाहनेही सुरक्षा रक्षकांनी तैनात केली होती.