kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशानंतर बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे १०० खाटांच्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रास मान्यता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अवघ्या तीन दिवसात बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक (आरोग्य प्रशिक्षण केंद्र) स्थापन करण्यास तसेच त्यासाठी ७७ कोटी ७९ लाख रुपयांच्या खर्चास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी बांधकाम, पदनिर्मिती व यंत्रसामग्री खरेदीसही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे मौजे सोमेश्वरनगरसह बारामती तालुका आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वर (वाघळवाडी) येथे, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी बैठक घेऊन यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अवघ्या तीन दिवसात  कार्यवाही पूर्ण करुन शंभर खाटांच्या आरोग्य पथकास (आरोग्य प्रशिक्षण केंद्रास) मान्यता देण्यात आली आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेस अधिन राहून ७७ कोटी ७९ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. आरोग्य केंद्राचे बांधकाम, पदनिर्मिती, यंत्रणा व साधनसामग्रीसंदर्भात प्रचलित नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.