kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“मराठीचा अभिमान बाळगा”; म्हणत उद्धव ठाकरेंचं खुमासदार भाषण

उद्धव ठाकरे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो. मी आता हे म्हटल्यावर उद्या पेपरमध्ये बातमी येणार उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. पण मी मागेही म्हटलं होतं. हिंदुत्व म्हणजे धोतर नाहीये सोडायला. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती. गर्व से कहो है हिंदू है ही घोषणा तर आपली आहेच. पण मी म्हणतोय की अभिमानाने आणि स्वाभिमानाने म्हणा की मी मराठी आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित खास कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.

१९६६ मध्ये मराठी माणूस थकलेल्या मानसिकतेत होता. त्या काळोखात एक ठिणगी पडली त्याचा वणवा झाला ती ही शिवसेना. आज मराठी भाषा दिन आहे. काल महाशिवरात्र आहे, त्याआधी शिवजयंती झाली. आता गुढी पाडवा येणार. आपल्या फोनवर मेसेज येतील हॅपी गुढीपाडवा वगैरे. मला तर वाटतं आहे की शुभेच्छा मराठीत द्यायला पाहिजेत त्याची गरज आहे. या दिवशी कुसुमाग्रज यांच्या कविता आपण ऐकत असतो. मराठी भाषा गौरव दिन आपण उत्सवासारखा साजरा करतो. कुठेतरी एक चिंतेची किनारही लागली आहे. कारण गद्दारी करुन आपलं सरकार पाडल्यानंतर हमे मराठी नहीं आती हे आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. असं जिथे ऐकू जाईल तिथे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे. महाराष्ट्र गीत वगैरे नुसतं ऐकत जायचं का आपण? ते वा वा करण्यासाठी नाही. त्या गाण्यात महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याप्रमाणे वागा. तसं वागलो तर मराठी भाषेलाही आपला अभिमान वाटेल.

मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडलं. त्यात पंतप्रधान जे बोलले ते बोलले. पण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या भाषणावर चर्चा व्हायला होती. मला त्यांचं भाषण आवडलं कारण राज्याला दिशा दाखवणारं ते भाषण होतं. मी जैविक नाही म्हणणाऱ्यावर आपण विश्वास ठेवायचा का? जो म्हणतो मला भगवान ने भेजा है त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. साधू संतांनी आपल्याला जगावं कसं हे सांगितलं आणि दाखवून दिलं. भवाळकर यांनी कुंकू याबाबतही बोलल्या. माझ्या आजोबांच्या विचारांशी मिळतेजुळते त्यांचे विचार आहेत. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

एका बाजूला आपण मंगळावर यान गेलं म्हणून आपण फटाके वाजवतो. मंगळवार यान उतरत असताना पृथ्वीवर आपण माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधत असतो. मंगळावर माणूस आणि माणसाच्या पत्रिकेत मंगळ नेमकं जायचं आहे कुठे तुम्हाला? चांगला नागरिक म्हणून जगायला शिकवणं म्हणजे संस्कार असतात. आत्ताही मला गंगेचं पाणी दिलं. नमामी गंगा वगैरे सगळं आहे. मी गंगेमध्ये जाऊन स्नान करुन आलो पण इकडे ५० खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारुन आलो त्याचा उपयोग काय? महाराष्ट्राशी गद्दारी करायची आणि तिकडे जाऊन डुबकी मारुन यायची. काहीही झालं कितीही डुबक्या मारल्या तरीही गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. या राजधानीतल्या रंगभूमीने मोठं योगदान दिलं आहे. त्या त्या वेळी आवश्यक असलेली नाटकं आणली गेली आणि समाजाने काय केलं पाहिजे हे शिकवलं. बाळासाहेबांचे विचार सांगणारे दुबईला जाऊन क्रिकेटची मॅच बघणारे लोक आम्हाला सांगत आहेत. हिंदुस्थान पाकिस्तान मॅच कुठेही असली तरीही आम्ही जाऊ मॅच पाहू. सगळे तिकडे जाऊन मॅच बघत आहात आणि परत येऊन आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवता. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून गावी जाऊन बसता मग मराठी रंगभूमिचं दालन का होऊ देत नाही? आम्ही उपऱ्यांना घुसू देणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिला.

कुसुमाग्रजांच्या दोन ओळी लिहून आणल्या आहेत. वाचून बोलायची सवय नाही कारण तसं बोलायची सवय असती तर कदाचित मी.. ते जाऊदे. मराठी शाळा बंद पडत आहेत, दुर्दैव आहे. माझीही मुलंही इंग्रजी शाळेत शिकली आहेत. तेव्हा काहूर उठलं होतं मराठी मराठी करणाऱ्यांची मुलं इंग्रजी शाळेत जातात. पण आज तु्म्हाला सांगतो आदित्य आणि तेजसला उभं करा बघा ते कसं मराठी बोलतात. याचं कारण घर आणि घरातले संस्कार आहेत. आदित्यला इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्यासाठी जात होतो तेव्हा मला आणि रश्मीला बाळासाहेबांनी सांगितलं होतं की इंग्रजी शाळेत, घरात मराठी. तसंच डॅडी वगैरे नाही घरात आई आणि बाबा असंच म्हणायचं. आम्ही मराठी शाळेत शिकलो. शिवसेना प्रमुखांना आणि प्रबोधनकारांना तर शाळेतलं शिक्षणच पूर्ण करता आलं नाही. सातवीतच प्रबोधनकारांना शाळा सोडावी लागली होती. बाळासाहेबांनाही फी भरता आली नाही म्हणून शाळेतून काढलं होतं.

मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषेची सक्ती केली होती. महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार. दुकानावर मराठी पाट्या हव्या हा कायदा मी मुख्यमंत्री असताना केला. पण सरकारच्या निर्णयाविरोधात एक कुणीतरी उपरा कोर्टात गेला ही हिमंत होतेच कशी? आम्ही हिंदू आहोत पण मराठीही आहोत. हम करे सो कायदा ते या दोघांचं चाललं आहे. मी गुजराती समाजाविरोधात नाही. पण त्या दोघांना मराठी आणि महाराष्ट्र खतम करायचा आहे. मुंबई ओरबाडायची आहे. उद्योगधंदे बाहेर न्यायचा आहे. मराठी माणसाच्या हातात भिकेचा कटोरा द्यायचा. पण तो कटोरा तोंडावर मारुन तुमच्यासमोर मराठी माणूस उभा राहिल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. कुसुमाग्रज म्हणाले आहेत की “परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका, भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शीर कापू नका.” आपल्या भाषेत काही कमतरता नाही. अभिजात भाषेचा दर्जा द्यायला किती काचकूच केली होती. तुम्ही कोण अभिजात भाषेचा दर्जा देणारे? छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती. ते नसते तर तुम्हाला दिल्ली दिसली नसती असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.