kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुण्यात आलिशान गाडी रस्त्यात थांबवून मद्यधुंद तरूणाची लघुशंका ; व्हिडीओ व्हायरल

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघात होण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. गेल्यावर्षी कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवत दुचाकीला धडक दिली होती. यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आलिशान बीएमडब्लू गाडी रस्त्याच्या मधोमध थांबवून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने रस्त्यातच लघुशंका केली. यानंतर स्थानिकांनी जेव्हा या युवकाला हटकले, तेव्हा युवकाने अश्लील हावभाव करून दाखवले. या घटनेचा व्हिडीओ स्थानिकांनी काढला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये काय दिसले?

पुणे नगर मार्गावर असलेल्या शास्त्रीनगर चौकात सदर संतापजनक घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सिग्नलवर निळ्या रंगाची एक आलिशान बीएमडब्लू गाडी उभी असल्याचे दिसते. तर गाडीच्या शेजारीच तरुण लघुशंका करत आहे. व्हिडीओ काढणाऱ्यांनी जेव्हा तरुणाला याबाबत जाब विचारला तेव्हा सदर तरुणाने अश्लिल हावभाव करून दाखवले. तसेच यावेळी गाडीत आणखी एक तरुण बसलेला दिसत आहे. ज्याच्या हातात दारूची बाटली दिसत असून तो व्हिडीओ काढा असे सांगत आहे.

या घटनेनंतर आता पुण्यातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते वसंत मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदर घटनेबद्दल संताप व्यक्त केला. स्थानिकांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मद्यधुंद तरुणांना हटकल्यानंतर त्यांनी अश्लील हावभाव करून दाखवले आणि गाडी वाघोलीच्या दिशेने वेगाने पळवली.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. त्यामुळे पुण्यात काय चालले आहे? असा प्रश्न उपस्थित झाला. रुपाली ठोंबरे यांनी सांगितले की, पुण्यात बाहेरील लोंढा वाढला असून ते अंदाधुंद पद्धतीने वागत आहेत. या घटनेतील दोन्ही मुले चांगल्या घरातील दिसत आहेत. एवढी आलिशान गाडी असून या मुलांना लघुशंकेसाठी शौचालयात जाता येत नाही. अशा तरुणांना कडक शासन झाले पाहीजे.

शिवेसनेचे नेते (ठाकरे) वसंत मोरे म्हणाले की, ज्या स्वारगेट परिसरात काही दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडली. त्याच परिसरात असलेल्या शास्त्री नगर भागात ही घटना घडलेली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस केवळ गाड्यांच्या काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेट यावरच कारवाई करण्यासाठी चौकात उभे असतात का? पोलिसांना या गोष्टी दिसत नाहीत का? एकंदर पुणे शहराचे पूर्ण वातावरण खराब झाले आहे. पोलिसांवर मार्च महिन्याचे टार्गेट आहे, असे दिसते. त्यांच्या टार्गेटमुळे गुन्हेगारी वाढली आहे, असा आरोप वसंत मोरे यांनी केला.