kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बापरे ! रात्री 12.53 AM ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पोस्ट ; जाणून घ्या काय आहे पोस्टमध्ये

विधानसभा निवडणुकीच्या निकालाला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही प्रचंड बहुमत मिळालेल्या महायुतीला मुख्यमंत्री कोण हे जाहीर करता आलेलं नाही. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून कायम रहावं अशी इच्छा त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी नोंदवलं आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या समर्थकांना एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्री 12 वाजून 53 मिनिटांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीट) अकाऊंटवरुन एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना आपल्या घराबाहेर न जमण्याचं आवाहन केलं आहे. “महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो,” असं मुख्यमंत्री शिंदेंनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसेच, “माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील,” असंही मुख्यमंत्र्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.