kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुण्यातील वारजे माळवाडीत बारामतीतील मतदान संपताच गोळीबार

पुण्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. दोन खून होण्याची घटना ताजी असतांना मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान संपल्यावर वारजे माळवाडी येथील रामनगर भागात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे या परसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पुण्यात काल बारामती लोकसभा मतदार संघासाठी मतदान झाले. या मतदानाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. वारजे माळवाडी हा भाग बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला मतदार संघात येतो. या ठिकाणी मतदान झाल्यावर रात्री ११ च्या सुमारास येथील रामनगर परिसरात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी हवेत तीन राऊंड फायर केले. या मुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

वारजे येथे मतदान शांततेत पार पडल्यानंतर रामनगर परिसरात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मंगळवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास मिळाली. या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस आणि गुन्हे शाखेतील पथकांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रामनगर भागातील शक्ती चौकात दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचे तपासात पुढे आले. मात्र, हा गोळीबार का करण्यात आला याची माहिती अद्याप पुढे आली नाही. पोलिस याचा तपास करत आहेत.