kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण ; ‘धर्मवीर 2’च्या निर्मात्यांचा मोठा निर्णय , चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेल्या ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. हा चित्रपट येत्या 9 ऑगस्ट रोजी जगभरात मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार होता. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. याविषयीची माहिती निर्माते मंगेश देसाई यांनी दिली. राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पहिल्या भागाच्या प्रचंड यशानंतर आता दुसऱ्या भागाविषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. मात्र या चित्रपटासाठी आता प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावं पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित करणं योग्य वाटत नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर इतक्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू.”

आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे. आपल्या लोककारणी नेत्याला ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. ‘धर्मवीर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि त्यांच्या आठवणी पुन्हा एकदा नव्याने जाग्या झाल्या. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट होती, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही प्राप्त केले आहेत.

‘धर्मवीर 2’च्या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे साहेबांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार असून याकडे आता अनेकांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच या सीक्वेलचा टीझर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांकडून या टीझरला दमदार प्रतिसाद मिळाला. प्रवीण तरडेंनीच ‘धर्मवीर 2’चं लेखन, दिग्दर्शन केलंय.