kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट लोकल ट्रेनने वांद्रे गाठले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पालघर दौऱ्यावर होते. ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांच्यासाठी आज सभा घेतली. या सभेतून ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ही सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पालघर ते वांद्रे लोकल ट्रेनने प्रवास केला. याबाबत व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे कारने बोईसर रेल्वे स्थानकावर पोहोचले. यावेळी रेल्वेस्थानकावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू होती. यावेळी ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. लोकलमध्ये प्रवासात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.काल केंद्रीय मंत्री अमित शाह नांदेड दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला आज उद्धव ठाकरे यांवी प्रत्युत्तर दिले.

” शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी भुमिपुत्रांच्या हक्कांसाठी सुरू केली त्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणता, नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का? मग त्यांचे दुसरे पार्टनर अमित शाह आले ते म्हणाले शिवसेना नकली आहे , तुम्ही बोला आम्ही भाजपाला भाडXX जनता पक्ष आहे म्हणतो भले आम्हाल तुम्ही नकली शिवसेना म्हणून टींगल करा. पण, शाह तुमच्या गाडीत अस्सल भाजपाची लोक किती राहिलेत बघा की सगळ्या स्टेपन्या बसल्या आहेत, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी केला.

“त्यांच्या पक्षाच कोणीच नाही म्हणून मी यांना भाडXX म्हणतो, सगळे याला फोड, त्याला फोड, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. मोदीजी तुम्ही विश्वगुरु आहात पण तुम्ही प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय भाषण पूर्ण का होत नाही. अमित शाह तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे. तिकडे काहीच बोलत नाहीत. पण इकडे उद्धव ठाकरे संपला पाहिजे, संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेंना संपवून दाखवा’, असंही ठाकरे म्हणाले.