kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“तुमच्या बापाला हरवलंय, माझ्या नादाला कुणी लागलं तर…”, मंदा म्हात्रेंचा संदीप नाईकांवर हल्लाबोल

नवी मुंबईत भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बेलापूरमध्ये गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी संपर्क कार्यालय सुरू केल्याने मंदा म्हात्रे चांगल्याच संतापल्याचे दिसून येते.

बेलापूर विधानसभेत सध्या भाजपकडून मंदा म्हात्रे आमदार आहेत. यानंतरही संदीप नाईक यांनी याच विधानसभेत कार्यालयाचे उद्घाटन करून आमदारकीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांना सज्जड दम दिला. तुमच्या बापाला हरवलं आहे, असं सांगत माझ्या नादाला कुणी लागलं तर त्याचा नाद खुळा केल्याशिवाय राहत नाही, असे मंत्रा म्हात्रे यांनी म्हटले. दरम्यान, मंदा म्हात्रे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्याला उत्तर देताना विरोधक कितीही बोलू देत, आपण काम करत राहणार, असा पलटवार संदीप नाईक यांनी केला.

दरम्यान, आमदार मंदा म्हात्रे आणि गणेश नाईक यांचे राजकीय वैर नवी मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र त्यामुळे राज्य पातळीवरील भाजप श्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचे विजय नाहटा यांचे नावे आघाडीवर आहेत .

नेमकं काय म्हणाल्या मंदा म्हात्रे?

नेरुळ येथील सेक्टर १० मध्ये भाजपच्या वतीने शुक्रवारी सीसीटीव्ही उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी भाषण केले. यावेळी त्या म्हणाल्या, “मी आमदार असल्याने या मतदारसंघाच्या उमेदवारीवर माझाच अधिकार आहे. सध्या काही जण बेलापूरमधून आमदार होण्याचे स्वप्न बघत आहेत. मात्र त्या स्वप्न बघणार्‍यांना मी सांगू इच्छिते, तुमच्या बापाला मी हरवून बसले आहे. माझ्या नादाला लागू नका. जो माझ्या नादाला लागतो, त्याचा नाद खुळा केल्याशिवाय राहत नाही.”