kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘जाने तू या जाने ना’ फेम इमरान खानने डोंगराळ भागात पारंपरिक गावरान पद्धतीनं बांधलं घर

२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारा आमिर खानचा भाचा इमरान खान सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहे. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटामुळे इमरान रातोरात स्टार झाला होता. या चित्रपटात तो अभिनेत्री जिनिलीया देशमुखबरोबर झळकला होता. इमरान-जिनिलीयाची जोडी सुपरहिट झाली होती. अजूनही इमरान-जिनिलीयाचा ‘जाने तू या जाने ना’ चित्रपट आणि त्यातील गाणी तितक्याच आवडीने पाहिली जातात. अशा लोकप्रिय चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या इमरान खानने डोंगराळ भागात स्वतःचं घर बांधलं आहे. याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

आपल्या सुंदर घराचे फोटो शेअर करत अभिनेत्याने लिहिलं आहे, “गेल्या काही वर्षांपासून मी जी काही काम केली, त्यापैकी एक म्हणजे घर बनवणं होतं. मी काही चित्रपटात आर्किटेक्चरची भूमिका केली होती. पण खऱ्या आयुष्यात कोणत्याही ट्रेनिंग शिवाय एक्सपर्ट होण्याचा दिखावा करू शकत नाही. पण मला गोष्टी स्वतः बनवण्यात आणि शिकण्यात खूप मजा येते. मी हे ठिकाण यासाठी निवडलं कारण हे कमाल आहे. दोन नद्यांनी वेढलेलं आणि कड्याच्या खाली वसलेलं आहे…तसंच अगदी घराच्या समोर सूर्यास्त होतो. मला माहित होतं, लँडस्केपनुसार घराची रचना करणं चांगलं असतं. माझा हेतू एक आलिशान हॉलिडे व्हिला तयार करण्याचा नव्हता, तर लँडस्केपमधून प्रेरित होऊन करण्याचा हेतू होता. घर हे फक्त पाहण्यासाठी नाहीये, हा एक निवारा आहे. जिथून तुम्ही निसर्गाचं निरीक्षण करून कौतुक करू शकता.”

“मी पहिलं वर्ष सूर्योदय आणि सूर्यास्त, पाऊस पडल्यानंतर धबधब्यांचा प्रवाह आणि ऋतूमध्ये बदलणारी पाने पाहण्यासाठी वेगवेगळ्या वेळी या ठिकाणी भेट दिली. यामुळे मला एक आधार मिळाला, ज्यावरून मी माझ्या काम रिवाइज करण्याबरोबर स्केचवर देखील काम करू शकलो होतो. माझ्या कॉन्ट्रॅक्टर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरशी सल्लामसलत केल्यानंतर मी काँक्रीट स्लॅब बांधण्याचा निर्णय रद्द केला. त्याऐवजी आजूबाजूच्या गावांमध्ये ज्याप्रमाणे घरं बांधण्यासाठी जी पद्धत वापरली आहे, त्या पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला. पाया बांधण्यासाठी दगड, एक मजली विटांच्या भिंती आणि छत्रासाठी पत्रे. बस एवढंच.”

पुढे इमरानने हे घर बांधण्यासाठी किती खर्च आला हे देखील स्पष्ट केलं. त्याने लिहिलं, “आधीच बांधून तयार झालेल्या व्हिलाच्या किंमतीपेक्षा मला खर्च कमी आला. मला आश्चर्य वाटते की मार्कअप कुठे जातो?”