kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

इंडियन आयडॉल 15: स्नेहा शंकरची निवड-नेपोटिझम की अस्सल प्रतिभा?

भारताचा अत्यंत लाडका गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल आपला 15 वा सीझन घेऊन, देशातले अनोखे आवाज घेऊन सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर परत येत आहे. ऑडिशनमध्ये असामान्य गान प्रतिभा लाभलेले अनेक स्पर्धक समोर आले. अशीच एक स्पर्धक म्हणजे 18 वर्षांची स्नेहा शंकर.

स्नेहा शंकर ही भारतीय फिल्म संगीतकार आणि गायक राम शंकर यांची मुलगी आहे. राम शंकर यांनी प्रामुख्याने बॉलीवूडमध्ये काम केले आहे आणि आजही ते भारतीय संगीत क्षेत्रात योगदान देत आहेत. स्नेहाचा जन्म मुंबईत एका संगीतप्रेमी आणि गायकांच्या घराण्यात झाला. स्नेहाचे आजोबा स्व. श्री. शंकरजी एक प्रसिद्ध सूफी गायक होते, ते आपल्या शंभूजी या भावासोबत जोडीत गात असत. त्या दोघांनी मिळून ‘शंकर शंभू कव्वाल’ असे मोठे नाव कमावले होते. स्नेहा या स्पर्धेत आली, तेव्हा परीक्षकांनी तिला ओळखले पण विशाल ददलानीला तिने केलेली गाण्याची निवड पसंत पडली नाही. तिने सूफीपेक्षा वेगळे काही तरी गायला हवे होते असे त्याचे मत होते.

या विरुद्ध, बादशाह मात्र तिच्या एकंदर परफॉर्मन्सने खूप प्रभावित झाला आणि तिचे कौतुक करताना म्हणाला, “मी या आधी तुला कधीच ऐकलेले नाही. पण आज जेव्हा तू गायलीस आणि जेव्हा मला तुला मिळालेला वारसा समजला तेव्हा मला वाटले की तू योग्य गाणे निवडलेस. तू दिसतेस तर राम शंकरजींसारखीच, पण त्यांची परंपरा देखील पुढे नेणार असे वाटते आहे. जेव्हा विशाल सरांनी तुझ्या परफॉर्मन्सवर टिप्पणी केली तेव्हा मी मनातून घाबरलोच! माझे काही चुकते आहे का असे वाटू लागले, कारण मला तुझे गाणे फारच आवडले! असे गाणारे स्पर्धकच आम्हाला हवे आहेत. पण, विशाल सर म्हणाले तसे तू हे लवकर शिकले पाहिजे. असा विचार कर की एक रेषा आहे, जिच्या एका बाजूला सुरक्षितता आणि कम्फर्ट आहे. तू कम्फर्टच्या जितकी जवळ राहशील तितकी महानतेपासून दूर राहशील आणि महानतेच्या जवळ जाण्यासाठी तुला कम्फर्टपासून दूर जावे लागेल. हा तुझा कम्फर्ट झोन आहे. आणि येथे तुझी कामगिरी उत्तम आहे. तुझ्यात महान बनण्याची पूर्ण क्षमताही आहे. मला माहीत आहे, हे इंडियन आयडॉल आहे आणि तू शंकरचा वारसा घेऊन आली आहेस, पण जर तू हे करू शकली नाहीस तर दुसरे कोण करू शकणार?”