पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काश्मीर आणि पाकिस्तानमधील संबंधांबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर भारताने मुनीर यांच्या विधानांना प्रत्युत्तर देत त्यांना फटकारले आहे. असीम मुनीर यांनी दावा केला होता की, काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे.यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मुनीर यांच्या या वक्तव्याला सडेतोड उत्तर देत म्हटले आहे की, काश्मीर आणि पाकिस्तानमधील एकमेव नाते म्हणजे पाकिस्तानने या प्रदेशाच्या काही भागावर केलेला बेकायदेशीर ताबा, जो त्यांनी आधी सोडायला पाहिजे.
“कोणतीही परदेशी गोष्ट एखाद्याच्या गळ्याची नस कशी असू शकते? हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. पाकिस्तानशी त्याचा एकमेव संबंध म्हणजे त्या देशाने या प्रदेशावर केलेला बेकायदेशीर ताबा असून, त्यांनी तो लवकरात लवकर सोडावा”, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच, परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत जयस्वाल यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेने भारताकडे केलेल्या प्रत्यार्पणावरूनही पाकिस्तानवर टीका केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, “पाकिस्तान खूप प्रयत्न करेल, परंतु जागतिक दहशतवादाचे केंद्र म्हणून असलेली त्यांची ओळख पुसली जाणार नाही.”
जनरल असीम मुनीर यांनी परदेशी पाकिस्तानींच्या मेळाव्यात बोलताना काश्मीरबाबत विधाने केली होती. याचबरोबर १९४७ मध्ये भारताच्या फाळणीला कारणीभूत ठरलेल्या वादग्रस्त द्विराष्ट्र सिद्धांताचे समर्थन केले होते. “आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे, काश्मीर आपल्या गळ्याची नस होती, ती आपल्या गळ्याची नस कायम राहील, आम्ही हे विसरणार नाही. आम्ही आमच्या काश्मिरी बांधवांना त्यांच्या संघर्षाच्या काळात एकटे सोडणार नाही,” “आपल्या पूर्वजांना वाटायचं की आपण प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आपला धर्म वेगळा आहे. आपल्या चालीरीती वेगळ्या आहेत, आपल्या परंपरा वेगळ्या आहेत, आपले विचार वेगळे आहेत, आपल्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे तिथेच द्विराष्ट्रीय सिद्धांताचा पाया रचला गेला. आता आपण दोन देश आहोत, एक नाही. आपल्या पूर्वजांनी या (पाकिस्तान) देशाच्या निर्मितीसाठी खूप त्याग केला. त्यामुळे आपल्याला देशाचं रक्षण कसे करायचे हे माहिती आहे.” असे मुनीर म्हणाले होते.
Leave a Reply