भाजप स्थापना दिनानिमित्त पणजीतील पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, ज्येष्ठ नेते गोविंद पर्वतकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आदींसह मंत्री, भाजप आमदार यावेळी उपस्थित होते. राज्यात भाजप वाढवण्यात जुने नेते आणि कार्यकर्त्यांचे योगदान आहे. जनसंघाच्या अनेक नेत्यांनी गोवा मुक्तीच्या लढ्यात सहभाग घेतला. त्यामुळे त्यांचे विस्मरण होता कामा नये, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. गेल्या दहा वर्षांच्या काळात राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यात केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला यश आले आहे. राज्याचा हा विकास यापुढेही कायम राहील. त्यासाठी भाजप कार्यकर्ते पुढील १०० वर्षे सक्रिय राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
काँग्रेसने केंद्रात आणि राज्यात केवळ मतांसाठी राजकारण केले. राजकीय स्वार्थासाठी भारतीय राजघटना पायदळी तुडवली. त्यामुळेच गोव्यासह देशभरातील जनतेने भाजपवर विश्वास ठेवल्याचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले. समाजसेवेला अग्रस्थानी ठेवून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांमुळेच राज्यात भाजपची संघटना वाढत गेल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गोव्यात भाजपच्या वाटचालीत जुन्या नेते, पदाधिकार्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे कार्य आम्ही कधीच विसरू शकत नाही. आगामी काळात पक्षाला अधिकाधिक बळकटी देण्याचे प्रयत्न प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण करणार असल्याचे दामू नाईक म्हणाले.
Leave a Reply