पहलगाममध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुख, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
याच बैठकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्यात ही नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली होती. “अहिंसा हा भारताचा धर्म आहे, भारतीय मूल्यांचा एक अविभाज्य घटक आहे. पण दहशतवादी, अत्याचारी, गुंड लोकांना धडा शिकवणंही आवश्यक आहे. रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला होता.” असे मोहन भागवत यांनी म्हटले होते. ‘द हिंदू मेनिफेस्टो’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात भागवत यांनी हे वक्तव्य केले होते.
ते पुढे म्हणाले, “अहिंसा हा आपला मूलभूत स्वभाव आहे. आमची अहिंसा लोकांना बदलण्यासाठी आहे. परंतु काही इतके भ्रष्ट आहेत की ते गोंधळ निर्माण करतील आणि ऐकणार नाहीत. रावणाचा वध देखील त्याच्या कल्याणसाठी झाला होता. तो बदलू शकला नाही म्हणून देवाने त्याला नष्ट केले, जेणेकरून तो नवीन जीवन मिळवू शकेल आणि सुधारू शकेल. जर अहिंसा हा आपला धर्म असेल तर गुंडांकडून मार न खाणे हा देखील आपला धर्म आहे. ज्यांना सुधारता येत नाही त्यांना अशा ठिकाणी पाठवले जाते जिथे त्यांचे कल्याण होईल. आम्ही आमच्या शेजाऱ्यांना कमी लेखत नाही. प्रजेचे कल्याण ही राजाची जबाबदारी आहे, तो त्याचे कर्तव्य पार पाडेल, तो त्याचा धर्म आहे, तो ते करेल.”
Leave a Reply