kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

माझे नाव ‘चर्चा’ ठेवा… मंत्रिमंडळ विस्तार आणि पंकजा मुंडे यांची मिश्कील कोपरखळी

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे निवडून आल्या. या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज्य मंत्रीमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचेही नाव समोर येत आहे. यावरून पंकजा मुंडे यांनी मिश्कील टोला लगावला आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मला कुठलीही कल्पना नाही. ते पक्षातील वरिष्ठांना माहीत असेल. पण, अशी काही चर्चा सुरु झाली की प्रत्येक वेळी माझ्या नावाची चर्चा होते. म्हणून आता माझे नाव चर्चा ठेवा, अशी कोपरखळी त्यांनी लगावली.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे आणि भाजपची राज्यात सत्ता आली. त्यानंतर एका वर्षातच अजित पवार यांनीही शरद पवार यांच्यापासून फारकत घेत शिवसेना आणि भाजपसोबत सत्तेत आले. त्यामुळे बीडमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील वैर संपुष्टात आले.

लोकसभा निवडणुकीत भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्याही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. अखेर, विधानपरिषदेत भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले. मात्र, आमदार झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे नाव मंत्रीपदासाठी घेतले जात आहे. याचवरून पंकजा मुंडे यांनी मिश्कील कोपरखळी लगावली.

पंकजा मुंडे यांनी ‘मी आमदार झाल्यामुळे लोकांचा उत्साह आणि आनंद प्रचंड आहे. मी हार, तुरे सत्कार घेतला नाही. भगवान बाबांच्या अंगावर हार, तुरे घातले. मात्र, मंत्रिमंडळाच्या विस्तार कधी होणार याची मला माहिती नाही. त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील. मंत्रीपदाबाबतचा निर्णयही वरिष्ठ घेतील. सध्या तरी आम्ही विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत आहोत. विधानसभेसाठी इच्छुकांमधून मार्ग काढला जाईल. जशा निवडणूका असतात तसेच हे चित्र आहे. एक एक पाऊल विजयाकडे टाकण्यासाठी कामाला लागलो आहोत. ज्या काही चर्चा सुरु आहेत त्यामुळे माझे नाव चर्चा असे ठवले पाहिजे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.