मुंबई, गुरुवार दिनांक 30 एप्रिल – बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) उपक्रमाने अलीकडे प्रस्तावित केलेल्या तिकीट आणि मासिक पास दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार मुंबई विभागाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. श्रीनिवासन यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात त्यांनी सांगितले की, बेस्ट ही फक्त वाहतूक सेवा नसून लाखो मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. अशा वेळी अचानक झालेली दुप्पट दरवाढ ही सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण करणारी आहे.
बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या, प्रवासी सेवा यांची सद्यस्थिती लक्षात घेतली असता, दरवाढ योग्य ठरणार नाही, असे मत त्यांनी मांडले. तसेच बेस्टच्या उत्पन्नवाढीसाठी दरवाढ न करता जाहिरात महसूल, प्रायोजकत्व यासारख्या पर्यायांचा विचार करण्याची सूचनाही त्यांनी केली.
“जर प्रशासनाने हा दरवाढीचा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर आम्ही जनतेच्या भावना घेऊन तीव्र आंदोलनात्मक भूमिका स्वीकारू,” असा इशाराही ॲड. मातेले यांनी दिला.
बेस्ट वाचवा – खिसा वाचवा – मुंबई वाचवा!
Leave a Reply