सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. हे केवळ आत्महत्या नसून, एका नियोजित मानसिक छळाचा शेवट असल्याचा दावा आता त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे. डॉ. वळसंगकर हे महाराष्ट्रातील प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ होते. त्यांच्या अशा प्रकारच्या मृत्यूनं वैद्यकीय व प्रशासकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांना अटक करून चौकशी सुरू केली. पहिल्याच दिवशी सहा तासांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. मनीषा माने यांच्या चौकशीनंतर आता पोलिसांनी वळसंगकर यांची सून डॉ. शोनाली यांचीही चौकशी केली आहे.
डॉ. शोनाली वळसंगकर या स्वतःही सोलापुरातील डीएनबी न्युरोसर्जन आहेत. सासऱ्याच्या आत्महत्येनंतर त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली असून, तपास गोपनीय ठेवण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांना अटक झाल्यावर पोलिस तपासाला गती मिळाली आहे. पोलिसांनी पहिल्याच दिवशी मनीषा यांची सहा तास चौकशी केली. दरम्यान, पोलिसांनी आज डॉ. वळसंगकर यांची सून शोनाली यांची चौकशी केल्याची माहिती मिळाली. चौकशीबाबत पोलिसांकडून गोपनीयता बाळगण्यात येत आहे.
मंगळवारी सुनेची पुन्हा सखोल चौकशी होणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. याआधी पोलिसांनी सुरवातीला फिर्यादी डॉ. अश्विन यांच्याकडे प्राथमिक तपास केला. त्यानंतर डॉक्टरांच्या मुलीकडेही काहीसा तपास झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी अजित लकडे यांनी सांगितले.
डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मानसिक त्रासाचा उल्लेख असल्याचं सांगितलं जातं. या पार्श्वभूमीवर पोलिस तपास अधिक गडद होत असून, आत्महत्येमागील कारणे शोधण्यासाठी सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग करण्याचाही विचार केला जात आहे.
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हे केवळ नैराश्य नव्हे, तर सतत होणाऱ्या छळामुळे घेतलेलं पाऊल असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व संबंधितांची चौकशी सुरु केली आहे. सुनेची चौकशी या आरोपांची पुष्टी करणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या तपासात आता अनेक नवीन धागेदोरे समोर येत आहेत. तपास यंत्रणा सर्व शक्यतांचा विचार करून काम करत असून, लवकरच या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
डॉ. वळसंगकर यांचा मृत्यू हा डॉक्टर समाजातही धक्का मानला जात आहे. अशा प्रकारचा मानसिक त्रास वैद्यकीय क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तींनाही सहन करावा लागत असेल, तर सामान्य डॉक्टरांचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Leave a Reply