kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘विरोधकांनी आपली राजकीय जात दाखवली’, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर विरोधकांवर घणाघात केला. आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. पण या बैठकीवर महाविकास आघाडीकडून बहिष्कार टाकण्यात आला. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. “मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. अगदी ठरवून ऐनवेळी संध्याकाळी सहा वाजता विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला. मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलायला त्यांना वेळ नाही. मात्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात. त्यासाठी त्यांना वेळ आहे. त्यामुळे एकप्रकारे आपली राजकीय जात कुठली हेच दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत”, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“ही अतिशय गंभीर बाब आहे की, ज्यावेळी महाराष्ट्रात समाजासमाजात तेढ निर्माण झालेली आहे, ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकांसमोर उभे आहेत, त्यावेळी सर्वपक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग शोधले पाहिजेत, अशा प्रकारची परंपरा असताना केवळ राजकीय फायद्याकरता दोन्ही समाजात खोटं बोलायचं आणि आपली राजकीय पोळी भाजायची, अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या ठिकाणी बहिष्कार घातला. याचा अर्थ त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्त्वाचा नाही. त्यांच्यासाठी सत्ता आणि निवडणुकाच महत्त्वाच्या आहेत”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला.

“मला याच गोष्टीचा आश्चर्य वाटतंय, या बैठकीला किमान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी तरी येतील. कारण त्यांनी वारंवार ही भूमिका मांडली की, दोन समाजात समन्वय साधा. पण मला असं वाटतं की, आजचा सर्व प्रकार हा जाणीवपूर्वक महाराष्ट्र पेटता राहिला पाहिजे आणि त्या पेटत्या महाराष्ट्रावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न विरोधी पक्षाने केलेला आहे”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“तथापि, या ठिकाणी विविध पक्षांचे नेते आले होते. त्यांनी आपापले मुद्दे योग्यप्रकारे मांडले आहेत. एक लार्जर कन्सेन्स तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ही सूचना मांडली आहे की, सर्व सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना सरकारने या मुद्द्यावर त्यांचं म्हणणं काय आहे हे लेखी मांगावं आणि प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करावी. दुटप्पी भूमिका ठेवू नये, अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावर योग्य प्रकारचा निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“महाराष्ट्रात जातीय सलोखा राहिला पाहिजे. विविध समाजांचे प्रश्न सुटले पाहिजेत. मराठा आरक्षणा संदर्भात सगेसोयरेच्या संदर्भात जे प्रश्न उभे राहिले आहेत त्यावर लार्जर कन्सेस तयार होऊन आपण महाराष्ट्र शांत करावा आणि समाजांना दिलासा द्यावा या दृष्टीने हा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. ज्या काही सूचना आल्या आहेत त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.