kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘गुलाबी’ उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग ;२२ नोव्हेंबरला येणार भेटीला

नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली असून व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘गुलाबी’ चित्रपट येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. ‘गुलाबी’ चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओमध्ये श्रुती मराठे, अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवत आहेत. शेवटी भेटण्याची तारीख २२ नोव्हेंबर ठरली असून या तारखेला प्रेक्षकांनाही ‘गुलाबी’ चित्रपटगृहात पाहाता येईल.

विचार, वागणूक, स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन आणि नावावरुन हा सिनेमा तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी पण तिघींची पार्श्वभूमी मात्र वेगळी आहे. त्यामुळे चित्रपटात काहीतरी वेगळी गोष्ट पाहायला मिळणार हे नक्की!

‘गुलाबी’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले की, “आज गणपती बाप्पाच्या प्रसन्न वातावरणात ‘गुलाबी’ चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. गुलाबी या नावावरून सिनेमा स्त्रीप्रधान असला, तरी त्यात मनोरंजनही तितकेच आढळून येईल. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतील. ‘गुलाबी’ हा चित्रपट केवळ एक कथा नाही, तर तो विचार, वागणूक, स्वप्न आणि नाती यांचा एक सुंदर गुलाबी प्रवास आहे, जो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अनुभवांशी जोडलेला आहे. या चित्रपटात आम्ही स्त्रीच्या भावविश्वाची, संघर्षाची आणि यशाची गाथा मांडली आहे. हा चित्रपट प्रत्येकाला स्वतःची ओळख आणि स्वप्ने पुन्हा नव्याने जगायला प्रेरित करेल. प्रेक्षकांना त्यांच्याशी निगडित असलेल्या भावना या चित्रपटातून नक्कीच अनुभवता येतील.”