kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

पुणेकरांनी पुसला कमी मतदानाचा शिक्का..!

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत सुमारे ५ लाख मतदान वाढले आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत सुमारे ८ लाख अधिक मतदारांनी मतदान केले आहे. यावरून लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सर्व २१ विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे पाच टक्के मतदान वाढल्याचे दिसत आहे. ही आजवरची मोठी वाढ आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. विशेष म्हणजे यातील ६ मतदारसंघांत १० टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची वाढ झाली आहे. त्याच वेळी तीन मतदारसंघांमध्ये लोकसभेपेक्षा कमी मतदान झाल्याचे दिसते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. सुहास दिवसे बोलत होते. त्यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होत्या. डाॅ. दिवसे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीच्या तुलनेत आताच्या विधानसभा निवडणुकीत मतदान वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत ५ लाख १३ हजार ८४३ इतके मतदार वाढले आहेत. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत ७ लाख ९३ हजार इतक्या अधिक मतदारांनी मतदान केले आहे.

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत मावळ, दौंड, भोसरी, शिरूर, खेड, आळंदी आणि जुन्नर या मतदारसंघामध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. इंदापूर, भोर, पुरंदर, आंबेगाव आणि खडकवासला या मतदारसंघात पाच ते दहा टक्क्यांदरम्यान मतदानाचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील २१ पैकी १२ मतदारसंघांत मतांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्याउलट पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि कोथरूड मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत मतदान पाहता कमी मतदान झाले आहे. पुण्यात खूप वर्षांनंतर प्रथमच विधानसभेला मतदानाचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या दीड वर्षापासून मतदार नोंदणीसाठी सुरू असलेले जनजागृतीचे प्रयत्न, मतदार याद्या याबाबत तक्रारींचे प्रमाण कमी होते. तसेच महिला, कामगार, आयटी क्षेत्र, तरुणवर्गाला मतदानाबाबत मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीत कमी प्रमाणात मतदान झाले होते. त्यामुळे कमी मतदान झालेली साडेआठ हजार केंद्रांपैकी अडीच हजार केंद्रे शोधून काढली होती. त्याबाबत उपाययोजना करण्यात आल्या. तसेच ९३ टक्के मतदान चिठ्ठ्यांचे वाटप केले. त्यामुळे यंदा विधानसभेला पाच टक्क्यांनी मतदान वाढले ही समाधानाची बाब आहे, असेही डाॅ. दिवसे म्हणाले.