kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बदलापूर प्रकरणावर राज ठाकरेंचं मोठं भाष्य; कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले…

गेल्या दोन दिवसांपासून बदलापूरमधील आंदोलन आणि त्याला कारणीभूत ठरलेला शहरातल्या आदर्श शाळेतला धक्कादायक प्रकार या गोष्टींची चर्चा पाहायला मिळत आहे. आदर्श शाळेत अक्षय शिंदे नावाच्या कर्मचाऱ्याने शाळेतल्या तीन वर्षांच्या दोन मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आणि नागरिकांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. मंगळवारी बदलापूरकरांनी तब्बल १० तास रेलरोको करून आरोपीला तिथल्या तिथे फाशी देण्याची मागणी केली. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणात आपल्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

मनसेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून यासंदर्भातला एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये राज ठाकरेंनी पीडित मुलींना कुणी भेटायला जाणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे. “आता एकच गोष्टीची काळजी घ्या. सारखे सारखे लोक येतील आणि त्या मुलींना व त्यांच्या घरच्यांना भेटून भेटून छळतील. त्या मुलींना आयुष्यभराचा त्रास देतील. त्यांचं घर कुणाला कळणार नाही, त्यांचं नाव कळणार नाही याची दक्षता घ्या. पोलिसांशी बोलून घ्या. त्यांच्या घरी कुणी जाणार नाही, त्यांना छळणार नाही, त्या मुलींना कुणी त्रास देणार नाही याची काळजी घ्या. त्या दोघींच्या पुढे आयुष्य पडलंय. त्या मुली लहान आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

“या सगळ्या प्रकरणात इतर कुणी राजकारणी भेटतील किंवा काय करतील मला माहिती नाही. पण आपल्याकडून ही गोष्ट घडता कामा नये. त्यांच्या घरच्यांनाही आधार द्या. त्यांना समजावून सांगा. त्या मुलींना त्रास होणार नाही एवढं फक्त बघा”, असं राज ठाकरेंनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

दरम्यान, आपणही बदलापूरला भेटायला येणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. पण त्या मुलींना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना आपण भेटणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. “मला तिथे येऊन भेटायचं आहेच. मी २५ तारखेला दौरा पूर्ण करून मुंबईत परत येईन. त्यानंतर मी आलो तर २६ तारखेला बदलापूरला येईन. पण मी एक गोष्ट सांगतो, मी त्यांच्या घरी जाणार नाही, त्यांना भेटणार नाही. त्या गोष्टीचा कुठेही त्या मुलींना, त्यांच्या घरच्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.