kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘रुप पाहतां लोचनी’.. ; वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची अभंगवाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यात सभा पार पडली. महायुतीचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची आज सभा आयोजित करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या भाषणाची मराठीत सुरुवात केली. भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर “चराचरांत वास करणारी, गुरुदेव शक्ती या सभेला उपस्थित सर्व बंधू-बघिणींना माझा जयगरु”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठीत म्हणाले. यानंतर नरेंद्र मोदी यांनी वर्ध्याच्या भूमीत जन्माला आलेल्या महापुरुषांना नमन केलं. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगालादेखील वंदन केलं. मोदींनी पांडुरंगाचं स्मरण करताना ‘रुप पाहतां लोचनी’ हा अभंग देखील म्हटला.

“ही भूमी, अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीच्या महासंगमची भूमी आहे. इथे अप्रतिम बलिदानांवर वसलेले आष्ठी गावची प्रेरणा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, लालूजी महाराज, संत मायबाई, आडकूजी महाराज असे अनेक किती अगणित महान संतांचे आशीर्वाद या भूमीत मिळतात. मी आज भाग्यशाली आहे की, या भूमीवर मला या सर्व पुण्य आतम्यांना प्रणाम करण्याची संधी मिळाली”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“आज चैत्र एकादशीदेखील आहे. पंढरपूरची आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी अशा चार यात्रा महत्त्वाच्या असतात. यापैकी आज चैत्र एकादशीची यात्रा आहे. आज प्रत्येक दिशेला गुंजत आहे, रुप पाहतां लोचनीं, सुख जालें वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अशा पुण्यपर्वकाळात भगवान श्री विठ्ठलांच्या चरणी मी शतश: नमन करतो”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“मी गुजरातमध्ये जन्माला आलोय. त्यामुळे स्वभाविक आहे, वर्धा आणि अमरावतीशी एक वेगळं नातं. पुज्य बापू गुजरातच्या भूमीवर जन्माला आले आणि वर्धा त्यांची कर्मभूमी राहिलेली आहे. विनोबा भावे हे देखील बडोद्यात बरेच वर्ष राहिल्यानंतर इथे वर्ध्यात आले होते. २०२४ ची ही निवडणूक विकसित भारत, आत्मनिर्भर भारतच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचं स्वप्न आहे. हे स्वप्न देशाच्या स्वातंत्र्याआधी बापूंनी पाहिलं होतं. त्यामुळे देश ज्या दिशेला निर्णायक पाऊल उचलायला जात आहे, त्यामध्ये वर्धाचा विशेष आशीर्वाद पाहिजे”, असं आवाहन मोदींनी वर्ध्याच्या नागरिकांना केलं.