kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

शरद पवारांच्या हस्ते नारळ फोडून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभ

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते कण्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कण्हेरी येथील ग्रामस्थ, पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, की भाजपाला घटना बदलायची आहे म्हणून त्यांना जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत, असे त्यांच्यातीलच एक मंत्री म्हणाले. आमच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाचा हिशेब मागणाऱ्यांनी अगोदर त्यांच्या २०१४ ते २०२४ या काळातील राजवटीचा हिशेब द्यावा. या काळात कुणाचे राज्य होते असा सवालही त्यांनी विचारला.

सकाळी पवारांसोबत हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “ आपल्याला वाद वाढवायचा नाही, संघर्ष वाढवायचा नाही, काम करायचे आहे आणि तुतारी वाजवायची आहे. साहेबांनी ९० टक्के वेगवेगळ्या संस्था बारामती तालुक्यासह महाराष्ट्रामध्ये आणल्या आहेत.”

आमदार रोहित पवार म्हणाले की, “कोणी कितीही काहीही म्हटले, तरी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला माहित आहे, की बारामती आणि महाराष्ट्राचा विकास कोणी केला, यंदा सुप्रिया सुळे यांना बारामती तालुक्यात कमीत कमी दीड लाखाचा लीड मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.” आमदार संजय जगताप यांनी यावेळी बोलताना बारामती पेक्षा पुरंदर तालुका ताईला जास्त लीड देईल असा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, सन १९६७ पासून प्रत्येक निवडणूकीत शरद पवार याच मंदिरातून नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करतात.याशिवाय वेळ मिळेल तसे आणि बारामतीत असल्यानंतर ते अनेकदा सहकुटुंब दर्शनाला देखील येतात. त्यानुसार आजही खासदार सुळे यांच्या प्रचाराचा नारळ येथेच फोडण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, सतीश मामा खोमणे, आमदार संजय जगताप, श्रीनिवास पवार, आमदार रोहित पवार, सत्यवान काळे, जितेंद्र पवार, कविता मित्र, राजेंद्र दादा पवार, बारामती तालुका अध्यक्ष एस एन बापू, यांच्यासह पवार कुटुंबीय, अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि मोठ्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.