kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

दिल्लीत झाल्या गाठीभेटी अन भाजपने उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर साधला निशाणा

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? असा चर्चा रंगू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्यानंतर तेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असेही बोलले जात आहे. यावरून आता भाजपने उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि रणनीतीबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची देखील घेतली. यामुळे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मविआच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, बाजारात नाही तुरी अन् नवरा नवरीला मारी, अशा प्रकारची मराठीत म्हण आहे. तशीच अवस्था महाविकास आघाडीत शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची झाली आहे. यांना बहुमताचा पत्ता नाही, प्रत्येकाला 100 जागा लढवायला मिळतील की नाही हे देखील माहित नाही आणि हे मुख्यमंत्री पदावरून भांडत आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. तसेच मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे. कारण जनता महायुतीसोबत आहे. लोकसभेत नशिबाने पन्नास हजाराहून कमी मताधिक्याने काही जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. त्यामुळे हे लोक हरभऱ्याच्या झाडावर चढत आहेत. मात्र, महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. जनता विकासासोबत उभी आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास करणाऱ्या महायुतीलाच ते पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून देतील, असा विश्वास अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला.

केशव उपाध्ये म्हणाले की, मागील तीन दिवस दिल्लीत मविआच्या बैठका सुरू होत्या. तीन दिवस चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. तीन दिवस जात्यावरचे दळण सुरू होते. मात्र यातून रस आलाच नाही. महाविकास आघाडी कोरडे चिपाट आहे. तीन दिवसात दळण केले पण पीठ आलेच नाही. कारण मविआने फक्त दगड टाकले होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तीन दिवस केलेली हुजरेगिरी होती. पण त्याला देखील यश आलेले नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.