महायुतीत रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रणसंग्राम सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना थेट आव्हान दिलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्येही शाब्दिक खडाखडी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकमेकांना इशारे प्रतिइशारे दिले जात आहेत..
लोकसभा निवडणुकीत जर काही चुकीचं वागलो असेन ते दाखवून द्या असं गोगावले म्हणाले आहेत. भरत गोगावलेंच्या या आव्हानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी भरत गोगावलेंना थेट गुवाहटीचे व्हिडिओ बाहेर काढण्याचाच इशारा दिलं गोगावलेंनी उंची पाहून बोलण्याचा सल्लाही चव्हाण यांनी दिला आहे.
सुरज चव्हाण यांना शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जर त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल असा सूचक इशारा दळवी यांनी दिला आहे. एकनाथ शिंदेंनी या थ्री ईडीएट्सना आवरावं अशी मागणी करत सुरज चव्हाण यांनी भरत गोगावलेंसह शिवसेनेच्या रायगडमधील आमदारांवर निशाणा साधला आहे.
रायगडमध्ये काय चाललंय हे एकनाथ शिंदेंना माहित आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय होईल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. एकमेकांची उणीधुणी काढण्यापर्यंत नेत्यांची भाषा खालावली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते यावर तोडगा काढणार की हा वाद आणखी चिघळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.