kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

“एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या” ; अँड.अमोल मातेले यांचा परिवहन विभागावर तुफान आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व युवक अध्यक्ष (मुंबई), अँड.अमोल मातेले यांनी एसटी भाडेवाढीच्या निर्णयावर प्रखर टीका करत ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी या निर्णयामागील गोंधळावर आणि सरकारच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकारच्या गोंधळामुळे जनता हैराण:

“परिवहन मंत्र्यांनी जर भाडेवाढीचा निर्णय घेतला नसेल, तर मग हा निर्णय कोण घेतो? हे खाते चालवतं कोण? असा प्रश्न उपस्थित करत सरकारमधील जबाबदारीच्या अभावावर त्यांनी थेट हल्ला चढवला आहे. एका बाजूला परिवहन मंत्री जबाबदारी झटकतात, तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा याला विरोध आहे. मग, एसटी भाडेवाढ हा निर्णय नेमका कुणाचा आहे? सरकारच्या प्रत्येक निर्णयामागे गोंधळच दिसतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का?

“जर भाडेवाढीचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल, तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आणि जर चांगले निर्णय झाले तर मंत्र्यांना श्रेय, पण चुकीचे निर्णय झाले की अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे, ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. परिवहन खाते म्हणजे खेळाचा मैदान नाही, हा पोरखेळ जनतेला नकोय,” असे सांगत त्यांनी सरकारमधील अंतर्गत वादांवर प्रकाश टाकला.

सरकारमधील अंतर्गत भांडणे:

“एसटीसारख्या महत्त्वाच्या सेवेवर सरकारचा कोणताही ठाम निर्णय नाही. मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये एकमेकांवर जबाबदारी टाकण्याचा खेळ सुरू आहे. परिणामी, सामान्य जनता त्रस्त होतेय. सरकारमध्ये खरेच काही ‘गंमत जंमत’ सुरू आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला.

एसटी सेवा – सामान्य जनतेचा आधार:

“एसटी सेवा ही ग्रामीण आणि शहरी जनतेसाठी जीवनरेखा आहे. भाडेवाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांवर आर्थिक बोजा पडतो. सरकारने त्वरेने हा निर्णय मागे घेत जनतेला दिलासा द्यावा,” अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी केली.

राजकीय जबाबदारीची गरज:

“सरकारने जनतेच्या हितासाठी काम करणे आवश्यक आहे. पण इथे मात्र केवळ अंतर्गत वाद आणि निर्णयांवर गोंधळ सुरू आहे. जर सरकारला जनतेची काळजी नसेल, तर त्यांनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारही नाही,” असे सांगून त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.