kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

‘कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, ; ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २’ ट्रेलर लॉन्च ; ट्रेलरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ २०२२ मध्ये दिग्दर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक यांनी निभावली आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘सनातन हिंदू संस्थेचा मान आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशीतरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग’, अशा संवादासह धर्मवीर २चा ट्रेलर सादर करण्यात आला. शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलच्या ट्रेलरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवल्यानुसार, “आपल्या संघटनेचा माज आहे, हा भगवा रंग, सनातन हिंदू संस्थेचा मान आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवरायांचा स्वप्न होता, हा भगवा रंग आणि कोणाशीतरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग” या डायलॉगने ट्रेलरची सुरूवात झाली आहे. याबरोबरच, आपणच आपल्या धर्माची लाज नाही राखली तर दुसरे कोणीतरी येऊन ती उतरवतील, असे संवाद या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आयुष्यावर आधारित भूमिकादेखील पाहायला मिळाली आहे. आता हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २’ ट्रेलर लॉन्च सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिग्गज अभिनेते अशोक सराफ, गोविंदा, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर या ट्रेलर लॉन्चवेळी उपस्थित होते. मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ९ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. “ज्यांच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की…” असं सांगत ते संबंधित महिलेला मारहाण करणाऱ्याला चांगलाच धडा शिकवल्याचे टिझरमध्ये पाहायला मिळाले होते. ‘धर्मवीर २’बद्दल सांगायचं झालं, तर या सिनेमाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची, तर क्षितीश दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.