Breaking News

अभिनेते सैफ अली खानवर हल्ला, बाबा सिद्दीकींची हत्या अन्…; वांद्रे परिसर हिट-लिस्टवर?

बॉलिवूड अभिनेते सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला असून यात सैफ अली खान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ६ वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला दुखापत झाली आणि चाकूचा एक छोटासा भाग त्याच्या पाठीतून काढण्यात आला होता. यानंतर तातडीने त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेनं कंबर कसली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीम तपास करत आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या एकूण १५ टीम कार्यरत आहेत.

नेमकं काय घडलं ?

सैफच्या घरातील मोलकरणीने जेव्हा चोराला पाहिलं, तेव्हा तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ तिथे आला आणि त्याच क्षणी चोराने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात सैफच्या शरीरावर सहा जखमा झाल्या आहेत. आता या घटनेनंतर मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

वांद्रे नक्की सुरक्षित आहे का ?

मुंबईतील वांद्रे हा उच्चभ्रू वसाहतीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात अनेक सेलिब्रेटींची घरं आहेत. या भागात अनेक शाळा, महाविद्यालये, डिझाईनर ज्वेलरी शोरूम आणि चांगल्या सामाजिक पायाभूत सुविधा आहेत. वांद्र्यातील या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वांद्रे हा परिसर हिट-लिस्टवर आहे का, अशी चर्चा रंगली आहे. कारण आता नुकतंच अभिनेता सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरी हल्ला घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याआधी अभिनेता सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यात आला. यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. तसेच अभिनेता शाहरुख खानलाही धमकी मिळाली होती. त्यामुळे वांद्रे नक्की सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सलमान खानच्या घरावर हल्ला

सैफ अली खानच्या आधी सलमान खानच्या घरावर हल्ला झाला होता. 14 एप्रिल 2024 रोजी लॉरेन्स टोळीतील दोन शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला होता. वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पहाटे दोन अज्ञातांनी हवेत तीन ते चार राऊंड फायर केले होते. यावेळी दोन्ही शूटर बाईकवर आले. त्यांनी हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला. यानंतर सलमानच्या सुरक्षेचा विचार करून त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत बुलेटप्रूफ काच लावण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.

बाबा सिद्दीकींची हत्या

माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी हत्या झाली होती. मुंबईतील खेरवाडी परिसरातील त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर रात्री 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. यावेळी काही अज्ञातांनी त्यांना घेरले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. बाबा सिद्दीकी हत्येचा तपास मुंबई गुन्हे शाखेने पूर्ण केला आहे. यानंतर 6 जानेवारी रोजी पोलिसांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईसह 26 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. बाबा सिद्दीकी अभिनेता सलमान खानच्या जवळ असल्याने आरोपींनी त्यांना टार्गेट केल्याचे पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटले होते.

शाहरुख खानला धमकीचा फोन

अभिनेता शाहरुख खानला 5 नोव्हेंबर 2024 रोजी धमकीचा फोन आला. यात त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याशिवाय त्याच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली. शाहरुखला धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी छत्तीसगडच्या रायपूर येथून अटक केली आहे. फैजान असे आरोपीचे नाव आहे. आणि तो पेशाने वकील आहे. शाहरुखला धमक्या मिळाल्यानंतर त्याच्या वांद्रे येथील मन्नत या बंगल्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *