Breaking News

बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत , टंचाईचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना करण्याबाबत खा. सुळे यांची शासनाकडे मागणी

बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला आहे. उन्हाळ्यापूर्वीच चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हे सर्व दिसत असूनही शासन काहीच उपाययोजना करत नाही, ही खेदाची बाब असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शासनाने तातडीने टंचाईचा आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

खासदारांना सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना , उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना पशुधन जगवावे कसे याची चिंता आहे. पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशांना भटकण्याची वेळ आलीय. आणखी उन्हाळा सुरू व्हायचा आहे, तोवरच ही परिस्थिती असून ती पुढील काही दिवसांत आणखी भीषण होऊ शकते, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

शासनाला ही सर्व परिस्थिती दिसत असूनही त्यावर योग्य ती उपाययोजना होताना दिसत नाही. ही अतिशय खेदाची बाब आहे, असे सांगत सुळे यांनी, ‘नागरिकांना होणारा त्रास बघूनही शासन शांत कसे बसू शकते याचे आश्चर्य वाटते’, असे पुढे नमूद केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी बारामती लोकसभा मतदारसंघातील टंचाईचा आढावा घेऊन तातडीने चारा छावण्या आणि पाण्याचे टॅंकर सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.