kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

बाल चित्रपट महोत्सवाचे सर्वत्र आयोजन केले पाहिजे– महेश कोठारे

बालचित्रपट महोत्सव सर्वत्र आयोजित करणे महत्वाचे आहे कारण चित्रपट बघूनच मुले खूप शिकत असतात. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मुलांनी देखील असे मराठी चित्रपट बघितले पाहिजेत माझे बहुतेक चित्रपट प्रौढांबरोबर लहान मुलांनी देखील जास्त बघितले ही आनंदाची बाब आहे. बाल चित्रपट म्हणजे त्यात लहान मुले असलीच पाहिजे अस नाही विषय व मांडणी महत्वाची असते असे प्रतिपादन अभिनेते महेश कोठारे यांनी केले.

पुण्यात १९ ते २५ एप्रिल या कालावधीत सिटी प्राईड कोथरूड येथे संपन्न झालेल्या बाल चित्रपट महोत्सवाची सांगता अभिनेते महेश कोठारे यांच्या हस्ते आज झाली त्यावेळी ते बोलत होते.

‘संवाद पुणे’ तर्फे आयोजित या बाल चित्रपट महोत्सवाच्या  सांगता समारंभात जेष्ठ कवी रामदास फुटाणे यांच्या हस्ते अभिनेते महेश कोठारे यांचा सत्कार करण्यात आला. बालकलाकार ते अभिनेता हा प्रवास केल्याबद्दल महेश कोठारेंचा हा सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी मंदार जोशी यांनी लिहिलेले ‘डॅम इट आणि बरंच काही’… या महेश कोठारे यांच्या आत्म चरित्रावर असलेल्या पुस्तकाचे ‘स्टोरीटेल’ ऑडियो ॲपमध्ये प्रकाशन करण्यात आले.

यावेळी स्टोरीटेलचे प्रसाद मिराजदार म्हणाले की,‘स्टोरीटेल’ मध्ये स्वतःचे आत्मचरीत्र्य स्वतःच त्या व्यक्तीने वाचले आहे असा ‘स्टोरीटेल’ मधील हा पहिलच प्रयोग आहे. 

यावेळी रामदास फुटाणे म्हणाले, मुलांनी घरात मराठीतच बोलले पाहिजे, मुलांना पालकांनी मराठी बालनाट्ये, बाल चित्रपट दाखवले पाहिजेत. आपल्याला इंग्रजी चांगले आलेच पाहिजे पण मराठीचा बळी देऊन ते घरात येता कामा नये. पुढे ते म्हणाले “आजोबा नाचू लागले आणि आजी नाचू लागली अन शेमाडी नातवंडे इंग्रजी वाचू लागली,नातू नाचू लागला नात नाचू लागली आणि रोजची इंग्रजीची रद्दी घरी साठू लागली,अजाण मुळाखाली माती नाचू लागली आणि इंग्रजीच्या डोहाला पोथी टोचू लागली”….

या महोत्सवात दाखवल्या गेलेल्या सात चित्रपटांपैकी चार चित्रपट अजून रिलीज देखील झाले नाहीयेत त्यांचा प्रीमियर आता झालाय आणि त्या चित्रपटांचा मुलांनी आणि पालकांनी मनसोक्त आनंद घेतला आहे तसेच या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या चित्रपटांपैकी जिप्सी हा चित्रपट कांस महोत्सवासाठी जाणार असल्याची माहिती प्रोग्रॅम डायरेक्टर विशाल शिंदे यांनी दिली.

पालकांचा आणि मुलांचा जो प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे त्यावरून पुढच्या वर्षी आम्हला दोन स्क्रीन घ्यावे लागतील आणि याचा आम्हाला खूप आनंद होत आहे अशी भावना संवाद पुणेचे अध्यक्ष सुनिल महाजन यांनी व्यक्त केली. सिटी प्राईड कोथरुडचे अरविंद चाफळकर व प्रकाश चाफळकर, ‘कोहिनूर’ ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ‘कावरे आईसक्रीमचे’ राजूशेठ कावरे, ‘स्टोरीटेलचे’ प्रसाद मिराजदार, प्रोग्रॅम डायरेक्टर विशाल शिंदे, ‘मेहेता प्रकाशनचे’ अखिल मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सत्कार केला गेला. केतकी महाजन बोरकर यांनी प्रास्ताविक केले.