Breaking News

मविआला मोठं यश ! भूम परांड्यातील बंडखोरी रोखली, राहुल मोटे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अशातच, महाविकास आघाडीला धाराशीव जिल्ह्यात मोठे यश आले आहे. भूम परांडा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट दोघांकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. त्यामुळे ठाकरे गटाचे रणजित पाटील आणि शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आता ठाकरे गटाचे रणजित पाटील हे भूम परांडा मतदारसंघातून माघार घेणार आहेत.

त्यामुळे आता शरद पवार गटाचे राहुल मोटे हे भूम परांडा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. रणजित पाटील यांनी उमेदवारी माघारी घेण्यात शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले जाते. रणजित पाटील यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीतील वाद मिटल्याने भूम परांडा मतदारसंघात तानाजी सावंत यांच्यासमोरील आव्हान वाढू शकते. गेल्या निवडणुकीत राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांना कडवी टक्कर दिली होती.

ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 65 उमेदवारांच्या पहिल्या यादीत भूम परांडा मतदारसंघातून रणजित पाटील यांना संधी देण्यात आली होती. उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांचा मुलगा रणजित यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली होती. मात्र, भूम परांडा मतदारसंघातून शरद पवार गटाचे राहुल मोटे हे तानाजी सावंत यांना चांगली टक्कर देऊ शकतात, ते जिंकून येण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा शरद पवार गटाकडून केला जात होता. परंतु, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील चर्चेनंतर आता या मतदारसंघातून राहुल मोटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.