महाराष्ट्रात लोककला जगली पाहिजे. महाराष्ट्रातील लोकनाट्य केंद्रावर पारंपरिक वाद्ये वाजली जावी, यासाठी संस्कृतिक कार्य विभागाकडून नियमावली तयार करण्यात येईल. तसेच महसूल आणि पोलिस यंत्रणेने याकामी आवश्यक ती तातडीची पावले उचलण्यात येतील, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली. महाराष्ट्रातील लोक कलावंतांच्या विविध मागण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर मंत्री महोदयांनी लोककला केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून नियमावली तयार केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच, त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

लावणी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलाकारीच उत्तम आणि लोकप्रिय नृत्याविष्कार आहे. त्यामुळेच, कित्येक वर्षानंतरही लावणीची मोहिनी प्रेक्षकांवर कायम असून ग्रामीण भागात आजही यात्रा, जत्रा आणि विशेष कार्यक्रमांमध्ये लावणीचा नृत्यप्रकार पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आजही लोकनाट्य कला केंद्रावर लावणीची खास फर्माईश होते, व लावणी कलेचा नजराना पाहून चाहत्यांची विशेष दाद दिली जाते. मात्र, गेल्या काही वर्षात लावणी कला लोप पावत असून लावणीच्या जागी विभत्सपणा पसरवला जात आहे. लोकनाट्य केंद्रावर डी.जे.तसेच व साउंड सिस्टीम सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या कला केंद्राचे काम अटी व शर्तीनुसार होत नसेल तर जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र कला केंद्रांमध्ये लोकनाट्य व पारंपारिक लावणी शो मध्ये कलाकारांची कमतरता आहे. त्यामुळे, या कला केंद्रांसाठी नवीन कलाकार तयार व्हावेत यासाठी स्व.पद्मश्री श्रीमती यमुनाबाई वाईकर यांच्या नावे प्रशिक्षण सुरु करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री शेलार यांनी आजच्या बैठकीत दिली.

कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. याच सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुने चित्रपट, चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट्स अशी विविध स्मृतिचिन्हे ठेवण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.