kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात दोन गटात राडा ; हिंसाचारानंतर नागपुरात कर्फ्यु, पोलीस म्हणाले..

औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपुरातील महाल परिसरात काल (१७मार्च) रात्री दोन गटांच्या तरुणांमध्ये राडा झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यानंतर समाजकंटकांनी विविध भागात जाळपोळ करत पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले आहेत. त्यानंतर आता नागपुरातील काही भागात पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नागपुरात काल रात्री झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेनंतर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. त्यानंतर आता भारतीय नागरीक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत नागपूर शहरातील विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी यासंदर्भात आदेश जारी करुन पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहणार असल्याचे म्हटलं आहे.

“नागपूर शहरातील कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा संचारबंदी लागू राहील,” अशी माहिती नागपुरचे पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंगल यांनी दिली.

“सकाळी ११.३० वा. दरम्यान शिवाजी महाराज पुतळयासमोर विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूर तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाल नागपूर येथे विश्वहिंदु परिषद, बजरंग दल, नागपूरचे कार्यकर्ते एकत्रित येवून सदर ठिकाणी २०० ते २५० कार्यकर्ते जमा होउन औरंगजेब की कबर हटाव अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गणेशपेठ पोलीस ठाणे हद्यीत भालदारपुरा येथे संध्याकाळी १९.३० वा. सुमारे विशिष्ट समाजातील ८० ते १०० लोकांनी गैर कायद्याची मंडळी जमवून पोलीसांवर दगडफेक केली व तागावाचे वातावरण निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे जिवीतास धोका निर्माण होवून सार्वजनीक शांततेला बाधा निर्माण झाली,” अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली.