बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपास सुरू आहे. त्यातच, आज बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी आणि संतोष देशमुख प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडने सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून सीआयडीने त्याला अटकही केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात केज कोर्टात आज सुनावणी करण्यासाठी सीआयडी तर्फे विनंती केली असता, न्यायालयाने ही विनंती मान्य केली आहे. वाल्मिक कराडच्या रिमांडसाठी आजचं केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संध्याकाळी 7.30 नंतर सुनावणीसाठी सीआयडीने विनंती केली होती. या विनंतीला न्यायालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय सुनावणी होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करा, अशी खळबळजनक मागणी भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे.
बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाने सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराडवर आरोप होत आहे. वाल्मिक कराड 22 दिवसांपासून फरार होता. मात्र, आज अचानक वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात येत शरणागती पत्करली. तर दुसरीकडे विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता यावर भीम आर्मी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली आहे. देशमुख कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अशोक कांबळे यांनी ही खळबळजनक मागणी केली आहे.
संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळताना दिसतं नाहीये, कराड नावाचा व्यक्ती लपला कुठे होता? आम्हाला माहिती आहे की तो बीडमध्येच होता. पोलिसांच्या 50 गाड्या काल बीडमध्ये फिरत होत्या. याचं लोकांनी त्यांना पुण्यापर्यंत नेले, हा सगळं आधीच रचलेला प्लॅन होता. असा दावाही त्यांनी केला आहे.
हे सरकार वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी काम करतंय. संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी हे सरकार काम करत नाहीये. लवकरच आम्ही देशभरातील अन्यायग्रस्त लोकांना बोलावणार आहोत. आझाद मैदनवर निषेधार्थ आम्ही सभा घेऊ. यंत्रणा जर खरंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी काम करत असतील तर आतापर्यंत वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर झाला असता. जे जे आरोपी या प्रकरणात आहेत, त्यांचा एन्काऊंटर झाला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. भर रस्त्यामध्ये आरोपींचा एन्काऊंटर झाला पाहिजे, जे पोलीस हे कृत्य करतील त्यांचे संरक्षण आम्ही करू. जनता कायदा हातात घेणार नाही, जनतेला कायद्याने न्याय मिळवून घ्यायला येतो. असेही अशोक कांबळे म्हणाले.