Breaking News

आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्याच असत्या, शिंदे जगायच्या लायकीचाच नाही; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणी पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी भाष्य केले. आनंद दिघे असते तर शिंदेला गोळी घातलीच असती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी बदलापूर एन्काऊंटवर भाष्य केले. “आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्याच असत्या. असे महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचे नाही”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

“ठाणे जिल्ह्यात शिंदेला गोळी घातली. शिंदेला गोळ्या घालायला पाहिजे होत्या. त्याचा गुन्हाच तसा होता. आनंद दिघे असते तर शिंदेला गोळी घातलीच असती. हा नराधम महिलांवर अत्याचार करतो, महिलांची अब्रू लुटतो, त्याला गोळी घातली बरं झालं. शिंदेला मारायलाच पाहिजे होता. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतो. पण तरीही एक प्रश्न आहे. शिंदेला गोळी घातली कारण बाकीच्यांना वाचवायचे असेल. असं असलं तरी शिंदेला गोळ्या घातल्याच पाहिजे. आनंद दिघे असते तर शिंदेला गोळ्या घातल्याच असत्या. असे महिलांवर अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचे नाही”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

नेमकं प्रकरण काय?

बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अक्षय शिंदे हा सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात होता. यानंतर तपासासाठी ठाण्यातील पोलीस अधिकारी ट्रान्सफर वॉरंट घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यासाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात गेले होते.

आरोपी अक्षय शिंदेला पोलीस पथकाने तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर त्याला ठाणे येथे घेऊन जात असताना पोलीस वाहन मुंब्रा बायपास येथे आले. यावेळी आरोपी अक्षय शिंदे याने पथकातील पोलीस अधिकारी निलेश मोरे यांच्या कमरेचे सर्व्हिस पिस्तुल खेचून घेतले.

यानंतर पोलीस पथकाच्या दिशेने 03 राऊंड फायर केले. त्यापैकी 1 राऊंड निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीला लागला. त्यानंतर त्याने 2 राऊंड इतरत्र फायर केले. यानंतर स्वसंरक्षणार्थ पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने आरोपीच्या दिशेने 01 गोळी फायर केली. ही गोळी आरोपी अक्षय शिंदेंला लागली आणि तो जखमी झाला. यानंतर पोलीस पथकाने तात्काळ अक्षय शिंदेला उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी आरोपी अक्षय शिंदेला मृत घोषित केले.